Kusadgaon SRPF Training Centre : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रकल्पाची पळवापळवी झाल्याने राजकारण तापल्याचे आपण याआधी पाहिलं आहे. मात्र आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यातल्या राज्यात प्रकल्प पळवण्याचा प्रयत्न होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील कुसडगाव (Kusadgaon) इथे नव्याने सुरु होणाऱ्या 'एसआरपीएफ'चे प्रशिक्षण केंद्र (SRPF) जळगावच्या (Jalgaon) वरणगाव इथे नेण्याबाबत भाजपने (BJP) चाचपणी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


उपमुख्यमंत्र्याचा शेरा आणि राजकारण तापलं
एसआरपीएफचे प्रशिक्षण केंद्र कुसडगाव इथे करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला होता. बांधकाम करण्यासाठीची 34 कोटी 37 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन 22 जून 2022 रोजी या प्रशिक्षण केंद्राला कार्यारंभ आदेशही देण्यात आला. या प्रशिक्षण केंद्राचे 70 टक्के कामही पूर्ण झाले. मात्र आता राज्यात सरकार बदलल्याने हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जळगावच्या वरणगावला हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आमदार संजय सावकारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हे प्रशिक्षण वरणगाव येथे मंजूर करण्यात आले होते, ते पुन्हा वरणगावलाच व्हावं अशी विनंती केली. त्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी 'प्रशिक्षण केंद्र हे वरणगाव येथे मंजूर होते ते अन्यत्र हलवले असल्यास तो निर्णय स्थगित करुन पुनश्च वरणगाव येथे केंद्र करण्यात यावे' असा शेरा मारला आणि त्यावरुन राजकारण तापले आहे.


मविआ सरकार सत्तेत आल्यावर प्रशिक्षण केंद्र हिसकावून आणले : राम शिंदे
मात्र जेव्हा महाविकास आघाडी सरकार राज्यात आले तेव्हा जळगावच्या वरणगाव येथील प्रशिक्षण केंद्र आपण हिसकावून आणले. आता राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यावर तिथला लोकप्रतिनिधी त्यांना मंजूर असलेला प्रकल्प हा पुन्हा घेऊन जाणारच, असं भाजप आमदार राम शिंदे यांनी म्हटले आहे.


प्रशिक्षण केंद्राचे 70 टक्के काम पूर्ण
प्रशिक्षण केंद्राचे काम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले आहे. इमारतीचे काम, मैदानाचे काम पूर्ण होत आहे. डिसेंबर महिन्यात हे प्रशिक्षण केंद्र 100 टक्के पूर्ण होईल असं इथल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.


प्रशिक्षण केंद्र कुठेही जाऊ देणार नाही : ग्रामस्थ
कुसडगाव परिसरातील 116 एकर जमिनीवर होणाऱ्या या प्रशिक्षण केंद्रामुळे कुसडगाव आणि परिसरात चार ते पाच गावांचा विकास होणार आहे. तीन ते चार हजार नागरिकांचं वास्तव्य इथे वाढणार असल्याने शेती पिकांची, दुधाची मागणी वाढणार आहे. आजूबाजूच्या गावातील व्यापाराला चालना मिळणार आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण केंद्र आम्ही कुठेही जाऊ देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.


कोट्यवधी रुपयांच्या जमिनींचे अधिग्रहण झाले, प्रशिक्षण केंद्राचे काम 70 टक्के पूर्ण झाले असताना अशाप्रकारे राजकीय कुरघोडीसाठी प्रकल्प हलवण्याची चाचपणी करणं कितपत योग्य आहे अशी विचारणा नागरिक करत आहेत. नागरिकांच्या खिशातून येणाऱ्या कररुपी पैशाचा राजकारणासाठी चुराडा होऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.