अहमदनगर : जिल्ह्यातील राहाता शहरात केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. या वाढदिवसानिमित्त शहरातील मुख्य चौकात वाढदिवसाचे बॅनर देखील लावण्यात आले होते. याबरोबरच फुगे लावून सजावट करण्यात आली होती. उपस्थितांनी गाण्याच्या तालावर ठेका धरून झाडांचा अनोखा वाढदिवस साजरा केला.   


अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात साई योग फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून वृक्ष लागवड आणि संवर्धनाची चळवळ राबवली जात आहे. फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मागील सहा वर्षांत तब्बल अडीच हजार वृक्ष लावण्यात आले आहेत. त्यातील दोन हजार वृक्ष जिवंत ठेवण्यात फाऊंडेशनला यश आलंय. वृक्ष लावण्यासोबतच त्यांचे संगोपन करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य नेहमीच प्रयत्नशील असतात. सहा वर्षांपूर्वी लावलेल्या काही वृक्षांचा सहावा वाढदिवस मोठ्या धुमधडक्यात साजरा करण्यात आलाय.


भल्या सकाळीच साजरा करण्यात आलेल्या या अनोख्या वाढदिवसाठी फाऊंडेशनचे सर्व सदस्य, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राहाता ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी वृक्षांभोवती रांगोळी,  फुगे, फेटे, बॅनर लावून सजवलेले वृक्ष, रिमझिम पाऊस, अशा उल्हासित वातावरणात केक कापून साजरा करण्यात आलेल्या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करताना जो आनंद होतो, तसाच आनंद वृक्षांचा वाढदिवस साजरा करताना होत असल्याची भावना राहाता ग्रामस्थांनी व्यक्त केलीय.


वृक्ष लावणे सोपे आहे, मात्र त्याचे संगोपन करणे कठीण आहे. राहाता येथील साई योग फाऊंडेशनने आजतागायत शहर आणि परिसरात तब्बल दोन हजार वृक्ष लावलेत आणि त्यांचे संगोपन केले आहे. त्यामुळे राहाता शहर आता 'ग्रीन सिटी' म्हणून नावारूपाला येत आहे. वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे, अशा भावना वृक्षप्रेमिंमधून व्यक्त होत आहेत. 


महत्वाच्या बातम्या


Pune Metro News: काय सांगता? आता पुणे मेट्रोत साजरा करता येणार वाढदिवस


PHOTO : डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीचा 92 वा वाढदिवस दणक्यात!