Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पाटेगाव खंडाळा एमआयडीसी (MIDC) व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र पाठवले. मात्र यावरुन त्यांचे कट्टर राजकीय विरोधक भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले, पुणे येथे मोदींच्या कार्यक्रमावेळी फलक झळकवले. एमआयडीसी हा काय केंद्र सरकारचा प्रश्न आहे का? असा सवाल राम शिंदे यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे येथील कार्यक्रमात एमआयडीसीसाठी फलक झळकवण्यापेक्षा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्याच कार्यक्रमात होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी ते बसले होते. मग त्यांच्या हातात एखादं निवेदन किंवा पत्र का दिले नाही? असे विचारत राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली. रोहित पवारांनी ही नौटंकी बंद केली पाहिजे. उद्या तुम्ही एमआयडीसीसाठी जो बायडन यांना पत्र लिहाल. त्यामुळे एवढ्या लांबपर्यंत पत्र पाठवण्यापेक्षा घरातल्या घरी अजित दादांच्या उशाला पत्र ठेवलं असतं तर अजित दादांनी वाचलं असतं. पंतप्रधानांना तुम्ही पत्र पाठवले, मात्र तुम्ही यापूर्वी गावोगावी काही पत्र पेट्या लावल्या होत्या, त्यात आलेल्या पत्रापैकी किती प्रश्न सोडवले असा सवाल राम शिंदे यांनी उपस्थित केला.
निरव मोदीशी कुणी संधान साधलं याची चौकशी होईल
पाटेगाव खंडाळा येथेच एमआयडीसी व्हावी हा अट्टाहास रोहित पवार फक्त निरव मोदीची जमीन मिळवण्यासाठीच करत असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला. एमआयडीसीच्या जागेमध्ये निरव मोदी यांची जमीन कोणी समाविष्ट केली? कुणाच्या काळात समाविष्ट झाली? कुणी त्यांच्याशी संधान साधले? कोणाचे त्यांना कॉल झाले? याची सखोल चौकशी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लावली आहे, असं राम शिंदे म्हणाले. मी आमदार असतानाच ही जमीन निरव मोदीने खरेदी केली हे मी मान्य करतो, पण एमआयडीसीचा नकाशा कुणाच्या काळात तयार झाला याची देखील चौकशी झाली पाहिजे. एमआयडीसीचे हे प्रयत्न सुशिक्षित बेरोजगारांसाठी नाहीत, शेतकऱ्यांसाठी नाहीत असं राम शिंदे म्हणाले. उद्या जर निरव मोदीची जमीन संपादित करायची ठरली तर पैसे द्यायचे कुणाला? याचा अर्थ पावर ऑफ ॲटर्नी कोणाकडे आहे हे देखील सांगण्याची आवश्यकता असल्याच सूचक वक्तव्य राम शिंदे यांनी केलं
माझा नातू मोठे उद्योग व्यवसाय उभे करेल : राम शिंदे
2019 मध्ये माझ्या घराबाबत खूप मोठा इश्यू करण्यात आला, माझे घर प्रचंड मोठे आहे असं सांगितलं गेलं. माझं घर महाराष्ट्रात गाजलं, मी 2000 स्क्वेअर फुटामध्ये घर बांधलं, आता रोहित पवार यांनी दोन एकरमध्ये घर बांधलं याची देखील चर्चा व्हायला हवी असं राम शिंदे म्हणाले. रोहित पवार म्हणतात मी खूप मोठे मोठे उद्योग-व्यवसाय करतो तर माझाही नातू मोठ-मोठे उद्योग व्यवसाय उभा करेल असे राम शिंदे म्हणाले. रोहित पवारांचे आजोबा मुख्यमंत्री राहिले, चुलते पाच वेळेस उपमुख्यमंत्री राहिले त्यामुळे ते उद्योग व्यवसाय करु शकता मात्र आमच्या वडिलांनी दुसऱ्याच्या इथे सालाने काम केले. पण मी आमदार झालो, मंत्री झालो त्यामुळे आता आमचा नातू पुढे हे भविष्यात उद्योग व्यवसाय करेल असा खोचक टोला त्यांनी रोहित पवार यांना लगावला. माझी एक गुंठा देखील जमीन कर्जतमध्ये नाही त्याचेही उत्तर त्यांनी दिलं नाही.मात्र त्यांनी तीन वर्षांमध्ये किती गुंठे घेतले काय काय जमा केलं हे सांगायला पाहिजे असं आव्हान त्यांनी दिलं.
रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला उत्तर
स्पर्धा परीक्षा तसेच नोकर भरतीतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीच्या नावाखाली मोठी रक्कम जमा केली जाते यावरुन आ. रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सिरीयस मुले अशा परीक्षांमध्ये यावेत म्हणून फी आकारले जाते' असे उत्तर दिलं होतं. त्यावरुन देखील रोहित पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती, जे मुले पैसे वाचून एक वेळचं जेवण घेतात... अतिशय छोट्या खोल्यांमध्ये पाच - सहा मुले एकत्र राहतात अभ्यास करतात मग ही मुले सिरीयस नाहीत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. याबाबत बोलताना राम शिंदे यांनी रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे, रोहित पवार यांनी कुणावरही वैयक्तिक टीका करु नये. फीचा प्रश्न हा सामूहिक सरकारची जबाबदारी असते. नक्कीच कमी आकारले पाहिजे मात्र फी आकारणाऱ्यांमध्ये तुमचे चुलते उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आहेत हे विसरु नका हा सरकारचा सामूहिक प्रश्न आहे त्यामुळे वैयक्तिक टीका कोणावरही करु नका असं राम शिंदे म्हणाले.
संबंधित बातमी
Rohit Pawar :कर्जत - जामखेडमध्ये एमआयडीसीसाठी रोहित पवार आग्रही, थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र