Ahmednagar Bhingar Bandh : औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, लव्ह जिहाद तसंच धर्मांतरविरोधी कायदा करण्यात यावा या मागणीसाठी आज (11 जून) भिंगार बंदची (Bhingar Bandh) हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या (Sakal Hindu Samaj) वतीने ही बंदची हाक दिली आहे. औरंगजेबाचा (Aurangzeb) शेवट अहमदनगरमधील (Ahmednagar) याच भिंगारमध्ये (Bhingar) झाला होता. औरंगजेबाने आपल्या आयुष्याचे शेवटचे 13 महिने या भिंगार गावात गेले. औरंजेबाला शेवटची आंघोळ ज्या चौथऱ्यावर घालण्यात आली होती, तो चौथरा याच भिंगारमध्ये आहे. तो उखडून फेकण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता. त्यामुळे बंदच्या पार्श्वभूमीवर भिंगारमध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
बंद शांतते पाळा, कोणावरही बंद पाळण्यासाठी दबाव टाकू नका, पोलिसांचं आवाहन
औरंगजेबाचे फोटो झळकवणाऱ्या इतरांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्त्ववादी संघटनांनी आज भिंगार बंद पुकारला आहे. काल सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची बैठक पार पडली. हा बंद पाळण्यासाठी कोणावरही दबाव टाकू नये. तसंच हा बंद शांततेत पार पाडावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या आणि पोलिसांची एक तुकडी इथे तैनात करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
अहमदनगर शहरात मागील आठवड्यात एका दर्ग्याच्या संदल उरुस दरम्यान निघालेल्या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले होते. यातील एक फोटो मिरजगाव (Mirajgaon) इथल्या तरुणाने समाज माध्यमावर पोस्ट केला होता. यावरुन हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या घटनेच्या निषेधार्थ मिरजगावमधील काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी 8 जून रोजी मिरजगाव बंदचे आवाहन केले होतं. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावेळी मिरजगाव पोलिसांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून आसिम पठाण याच्याविरोधात हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसंच पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने हिंदुत्त्ववादी संघटनांनी 9 जून रोजी मिरजगाव बंद मागे घेतला. त्यानंतर गावातील व्यवहार सुरळीत झाले होते.
Ahmednagar : औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांकडून भिंगार बंद : ABP Majha
हेही वाचा