अहमदनगर : अहमदनगर मनमाड महामार्गावर (Ahmednagar Manmad Highway) आजपासून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. गेली अनेक वर्षांपासून खड्यात हरवलेला अहमदनगर मनमाड महामार्गाची दुरूस्तीचे काम आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे पुढील वीस दिवस अवजड वाहनांची वाहतूक अन्य रस्त्यांनी वळविण्यात येणार आहे.
मनमाडकडून येणारी वाहतूक वैजापूरमार्गे तर अहमदनगरहून शिर्डीकडे येणारी वाहने आळेफाटा मार्गे वळवण्यात आली आहे. पुढील वीस दिवस या महामार्गावर कोपरगावच्या पुणतांबा चौफुली ते नगर जवळील विळदपर्यंत जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता वर्ग होऊनही या महामार्गाची टेंडर प्रक्रिया रखडलीय तर काही महिन्यांपूर्वी ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याने महामार्ग खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. नव्याने रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी तात्पुरती डागडुजी करण्यासाठी नगर मनमाड महामार्गावरून सुरू असलेली जड वाहतूक पुढील विस दिवसांसाठी इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.दरम्यानच्या काळात महामार्गावर असणारे खड्डे बुजवण्याचं काम केलं जाणार आहे.
पुणे, सोलापूर, उस्मानाबादकडून मनमाडकडे जाणारी वाहतूक अहमदनगर येथून आळेफाटा मार्गे वळवण्यात आली. तर धुळे, जळगावकडून येणारी जड वाहने वैजापूर मार्गे अहमदनगरकडे वळवण्यात आली आहे. पुढील वीस दिवस केवळ हलक्या वाहनांनाच नगर ते कोपरगावपर्यंत प्रवास करता येणार आहे.
नितीन गडकरी यांना पत्र
मृत्यूचा सापळा बनलेल्या नगर-मनमाड महामार्गावर महाकाय खड्डे पडल्याने साईभक्तांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पेशाने वकिली करणारे तीन पोळ यांनी चक्क महामार्गावर असलेल्या खड्ड्यात बसून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलंय. नगर मनमाड महामार्गावरून प्रवास करण्याची विनंती या पत्राच्या माध्यमातून गडकरी यांना करण्यात आली आहे.