Ahmednagar News : राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवात (Navratri 2022) दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचे दान देवीला अर्पण करण्यात आलं आहे. रोख रक्कम, ऑनलाईन देणगी, सोने, चांदी आणि विविध स्वरुपात हे दान प्राप्त झालं आहे. श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थानच्या दानपेट्याची मोजणी नगर धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ. डी. एस. आंधळे, मोहटा देवस्थान समितीचे विश्‍वस्त, पाथर्डीतील सराफ व्यवसायिक काशिन्नाथ वामन शेवाळे, पोलीस आणि देवस्थान सुरक्षा यांच्या उपस्थितीत सीसीटीव्हीच्या निगराणीत झाले. यात रोख रक्कम 1 कोटी 27 लाख 60 हजार 554 रुपये, सोने 40 तोळे, चांदी वस्तू 13 किलो 810 ग्रॅम, 3 लाखांची चांदीचे छत्र आणि पंचारती तसेच विविध देणगी 40 लाख 29 हजार 930 रुपये, ऑनलाईन स्वरुपात देणगी 4 लाख 86 हजार 203 रुपये देणगी प्राप्त झाली आहे.


देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आणि माहूरच्या रेणुका मातेचे माहेरघर म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेले मोहटा देवी देवस्थान प्रसिद्ध आहे. नवरात्रकाळात गडावर राज्यातून तसेच परराज्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात देवीला भाविकांनी भरभरुन दान दिलं. त्याची मोजदाद केल्यानंतर देवीच्या चरणी दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त दान अर्पण झालं आहे.


मोहटादेवीच्या चरणी अर्पण झालेलं दान
रोख रक्कम - 1 कोटी 27 लाख 60 हजार 554 रुपये
सोने - 40 तोळे
चांदीच्या वस्तू - 13 किलो 810 ग्रॅम
विविध देणगी - 40 लाख 29 हजार 930 रुपये
ऑनलाईन स्वरुपातील देणगी - 4 लाख 86 हजार 203 रुपये


मोहटादेवी राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान
अहमदनगर जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. मोहटा देवीचे स्थान हे माहूरच्या देवीचे ठाण आहे.पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे नऊ किमी अंतरावर हे ठिकाण आहे. भक्ताच्या प्रार्थनेनुसार अश्वीन शुद्ध एकादशीला देवी गडावर येऊन राहिली अशी आख्यायिका आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटादेवीची ख्याती आहे. रझाकाराच्या काळात मोहटा गावात म्हशीचोरीची आख्यायिका आहे त्यामुळे येथे आजही येथे दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही. राज्यात सर्वत्र विजयादशमीच्या दिवशी देवीच्या यात्रा होतात. मात्र मोहट्याची यात्रा एकादशीच्या भरते. अलिकडील काही वर्षापासून मोहटा देवस्थान नावारुपाला आले आहे. भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.