Ahmednagar: लोकसभा निवडणूकांमध्ये झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत राज्यात महायुतीला प्रचंड मतांनी यश आलं. राज्यात महायुतीला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात 12 पैकी 10 महायुतीचे आमदार निवडून आले. मात्र, नव्या सरकारसमोर आता जिल्ह्यातील जुन्या प्रश्नांची आव्हाने असणार आहेत. पाण्याचे प्रश्न, नगर मनमाड महामार्गाचे काम, जलाशयांचे गाळ काढण्याचे काम अशा अनेक जुन्याच प्रश्नांचे आव्हान महायुतीच्या आमदारांसमोर असणार आहे. पाहूयात जिल्ह्यातील जाणकारांच्या मते कोणती आव्हाने महायुतीच्या आमदारांवर असतील..


अहिल्यानगरचा पाणीप्रश्न


नगर जिल्हा हा राज्यातील धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अहिल्यानगर जिल्ह्यात दक्षिण भागातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणीप्रश्न. अहिल्यानगर शहरासाठी आठ महिन्यांपूर्वी 495 कोटींच्या नवीन पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. पारनेर पाणी योजना देखील प्रलंबित आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 हजार 313 कोटींच्या जलजीवन मिशन, निधीअभावी थंडावले आहे. जुन सरकार हे नवं सरकार म्हणून पुन्हा आलेला आहे. या सरकारला अहिल्यानगरचे सर्व प्रश्न माहीत आहेत, त्यामुळे सरकार हे प्रश्न कसे सोडवणार असा प्रश्न नगरकरांना पडला आहे.-  संदेश कार्ले, नगरकर


नगर मनमाड महामार्गाचा प्रश्न


नगर जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचा आणि सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शिर्डीकडे जाणारा नगर-मनमाड महामार्ग...नगर-मनमाड महामार्ग हा ब्रिटिश कालीन रस्ता आहे... अहिल्यानगर जिल्ह्यात माजी दिवंगत खासदार बाळासाहेब विखेंपासून अनेक खासदार आमदार झाले मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न जैसे थे च आहे... केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात अनेक रस्ते बनवले रस्त्यांच जाळ उभ केल... मात्र नगर मनमाड रस्त्याचे काम हे अपूर्णच आहे...तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा रस्ता कधी पूर्ण होणार असा प्रश्न नगरकरांना पडला आहे.- रामदास ढमाले, जेष्ठ पत्रकार


जलाशयातील गाळाचे संचयन


जिल्ह्यातील मुळा धरणाच्या उभारणीपासून जलाशयाच्या तळाशी गाळाचे संचयन झाल्याने चलसाठा कमी होत आहे... मुळा विभागाने मेरी अर्थात महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट संस्थेला सॅम्पल पाठवले होते... त्यात वाळुचे प्रमाण सरासरी 60 टक्क्यांवर असल्याचे स्पष्ट झाले... आता गाळ काढण्यासाठी सविस्तर सर्वेक्षण मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.. मुळा धरणातील गाळ काढल्यास धरणाच्या जलसाठ्यात सुमारे 1468 दलघफू जलसाठ्यात वाढ होऊ शकते हा प्रश्न देखील महत्वाचा आहे..अहिल्यानगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे...त्यामुळे जिल्हा विभाजनाचा मुद्दा कायमच चर्चेत असतो. जिल्हा विभाजनाचा प्रश्न गेली चाळीस वर्षांपासून ऐरणीवर आहे. जिल्हा विभाजन झाल्यास  प्रशासकीय दृष्टीने सोयीस्कर होणार आहे. यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात एमआयडीसीची मागणी होत आहे...लोकप्रतिनिधींकडून त्यासाठी प्रस्ताव पाठवले जात आहे...या नव्या सरकारमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील किती अपेक्षा पूर्ण होतात हे ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. - सुनिल भोंगळ, अहिल्यानगर प्रतिनिधी


अहमदनगर जिल्ह्यातील आमदार: 12  


अकोले - किरण लहामटे (NCP) 


 संगमनेर - अमोल खताळ (शिवसेना) 


शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) 


कोपरगाव - आशुतोष काळे (NCP) 


 श्रीरामपूर - हेमंत ओगले (भाजप) 


 नेवासा - विठ्ठलराव लंघे (शिवसेना) 


 शेवगाव - मोनिका राजळे (भाजप) 


 राहुरी - शिवाजीराव कर्डीले (भाजप) 


पारनेर - काशिनाथ दाते (काँग्रेस) 


अहमदनगर शहर - संग्राम जगताप (NCP) 


श्रीगोंदा - विक्रम पाचपुते (भाजप) 


कर्जत जामखेड - रोहित पवार (NCP- SP)