Madhukar Pichad passed away : माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे आज निधन (Madhukar Pichad passed away)झाले आहे. त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मधुकर पिचड यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी त्यांनी आयुष्य पेरलं. मधुकर पिचड आजारावरती मात करतील असा आम्हाला विश्वास होता. पण आज एका चांगल्या सहकाऱ्याला मुकल्याचं आम्हाला दुःख आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुधकर पिचड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मधुकर पिचड यांचं काम अतिशय उत्तम, त्यांनी अनेक खाती सांभाळली
राष्ट्रवादीच्या सुरुवातीच्या काळामध्ये मधुकर पिचड यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांचं काम अतिशय उत्तम होतं. अनेक खाती त्यांनी संभाळली होती. आदिवासी भागात त्यांनी साखर कारखान्याची उभारणी केल्याचे शरद पवार म्हणाले. एका चांगल्या सहकाऱ्याला आज आम्ही मुकल्याचं आम्हाला दुःख होत असल्याचे शरद पवार म्हणाले. त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्यासाठी परमेश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना असे पवार म्हणाले.
आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली : मुख्यमंत्री
भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदार्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरत असताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले होते. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
मुधकर पिचड यांचं ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान : अजित पवार
माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेबांनी आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलं. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मधुकररावांचं जाणं हे माझं वैयक्तिक नुकसान : एकनाथ शिंदे
ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी कल्याणाचे एक प्रदीर्घ पर्व जणू संपले. आदिवासी कुटुंबातच जन्म घेतलेल्या मधुकररावांनी साठीच्या दशकाच्या प्रारंभाला दूध संघाची निर्मिती करुन समाजकारणाचा वसा घेतला. त्यांचे सारे राजकारण आदिवासी बांधवांच्या कल्याणाभोवतीच राहिले. काही काळ ते ठाण्याचे पालकमंत्रीही होते. त्यांच्यातला आदिवासींचा सजग कैवारी मला जवळून पाहायला मिळाला. मधुकररावांचं जाणं हे माझं वैयक्तिक नुकसान आहेच, पण महाराष्ट्राचंही कधीही न भरून येणारं नुकसान झालंय, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
ब्रेन स्ट्रोक आल्याने पिचड यांच्यावर सुरु होते उपचार
ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मधुकर पिचड यांची आज प्रकृती खालावली होती. ब्रेन स्ट्रोक आल्याने पिचड यांच्यावर दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान मधुकर पिचड यांच्या जाण्याने चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
महत्वाच्या बातम्या: