अहमदनगर : मराठा आरक्षणाबरोबरच (Maratha Reservation) आता धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर आंदोलन, उपोषणे सुरु आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील चौंडी गावातही मागील 13 दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू आहे. राज्यभरातून या आंदोलनाला भेट देण्यासाठी हजारो धनगर बांधव चौंडीत दाखल होत आहे. अशातच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी थेट नव वधू-वराची उपस्थिती आंदोलनस्थळी पाहायला मिळाली. देवदर्शनाला न जाता आंदोलनाला पाठिंबा देणं महत्वाचं असल्याचे नव वधू-वराने सांगितले. 


मराठा आरक्षणासोबत (Maratha Aarkshan) धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला असून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन (Protest) सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी (Chaundi) येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तेरा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी एका नवदांपत्याने भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला आहे. प्रतीक्षा आणि हरीश खरात यांनी थेट लग्न मंडपातून आंदोलनस्थळी भेट दिली. येणाऱ्या पिढीसाठी धनगर आरक्षण महत्वाचे असून, देवदर्शनाला जाण्याआधी आम्ही आंदोलनस्थळी आलो असून या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी म्हंटलं आहे. हे नवदाम्पत्याचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला असून यानंतर त्यांनी देवदर्शनाला न जाता आंदोलनाला पाठिंबा दिल्याने परिसरातून कौतुक होत आहे. 


दरम्यान या आंदोलनाला पद्मश्री माजी खासदार विकास महात्मे यांनी भेट देत पाठींबा दिला आहे. हे उपोषण कोणत्याही वैयक्तिक लाभासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी सुरू आहे. आता समाजाचा रोष वाढत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने यावर निर्णय घ्यावा, मी समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र कोणतेही सरकार असले तरीही धनगर बांधवांना हक्काच्या आरक्षणासाठी संघर्षच करावा लागतो आहे. त्यामुळे सरकारने तातडीनं यात सकारात्मक निर्णय घेण गरजेच आहे अशी भूमिका विकास महात्मे यांनी व्यक्त केली आहे.


ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांचा पाठिंबा


या उपोषण आंदोलनाला राज्यातील वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांकडून पाठींबा मिळत आहेत. ओबीसी समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील या उपोषणाला पाठींबा दिला आहे. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली असून आता धनगर बांधवांना ठोस आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि या आंदोलनाला ओबीसी समाजाच्या सर्वच संघटनांचा पाठींबा राहील अशी भूमिका सानप यांनी व्यक्त केली आहे. 


भाजप आमदार राम शिंदे यांचा आ. रोहित पवारांना प्रत्युत्तर


दरम्यान या उपोषणाला भाजप नेते राम शिंदे यांनी भेट दिलीये...या उपोषणावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टीका करताना माजी मंत्री राम शिंदे यांच्या गावात हे उपोषण सुरू आहे आणि त्यांना 11 दिवस एकही भाजपचा मंत्री आणता आला नाही त्यांचे भाजपमध्ये किती वजन आहे हे पाहावं लागेल अशी टीका केली होती,यावर बोलताना हे उपोषणस्थळ राजकारणाचे ठिकाण नाही त्यामुळे त्यावर बोलणार नाही मात्र कालच गिरीश महाजन हे आंदोलनस्थळी येऊन गेले यावरून कुणाचं किती वजन आहे हे लक्षात येत दोन दिवसात याबाबत बैठक होऊन सकारात्मक निर्णय होईल असं म्हंटलंय...


20 तारखेला खंबाटकी घाटात रास्ता रोको


चौंडी येथील यशवंत सेनेच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून धनगर बांधव पाठिंबा देत आहेत. दरम्यान दिवसभर राज्यभरातुन हजारो धनगर बांधवांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सायंकाळी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी यशवंत सेनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची आंदोलन स्थळी बैठक झाली. या बैठकीत येत्या 20 तारखेला खंबाटकी घाटात मोठा रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच चौंडी येथील उपोषण तोपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


Sangli News : आता गोपीचंद पडळकरांकडून घरचा आहेर, शिंदे फडणवीस सरकारला निर्वाणीचा इशारा; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत म्हणाले..