शिर्डी : साईंच्या दर्शनाला (Saibaba) राज्यभर नव्हे तर देशभरातून हजारो साई भक्त नित्यनियमानं शिर्डीत येतात. मात्र शिर्डीत वाढत असलेल्या अनधिकृत एजंटमुळे साई भक्तांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शिर्डीत प्रथमच आलेल्या त्रिपुरा राज्यातील एका साईभक्त महिलेने हा सगळा किस्सा सांगितला असून त्यामुळे पोलीस अशा बोगस एजंटवर कारवाई करण्याची करणार का? हे पाहण महत्वाचे आहे. अनेक वर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी सुद्धा बोगस एजंटवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


शिर्डीच्या साईबाबा मंदिर (Shirdi Saibaba Mandir) दर्शनासाठी वर्षभर भाविकांचा राबता असतो. देशभरातून भाविक भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. मात्र अनेकदा झटपट दर्शन मिळवून देण्याच्या नावाखाली काही एंजट काम करत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील त्रिपुरा (Tripura) राज्यातील आगरताला (Agartala) येथील भाविकांसोबत घडलेला प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आगरतला येथील पूनम भौमिक या साईभक्त आपल्या कुटुंबासमवेत साईबाबांच्या शिर्डीला प्रथमच आल्या होत्या. वाहनाने येत असतानाच दोन दुचाकीस्वारांनी त्यांना झटपट दर्शन मिळवून देतो असं सांगत एका दुकानात नेलं. त्या ठिकाणी त्या महिलेला हार, फुल, प्रसाद असं देत तब्बल पाच हजारांचे बिल दिले. मात्र त्या महिलेने हे बिल अधिक असल्याचं सांगितलं. 


त्यानंतर साडेतीन हजार रुपयात तिने हे सर्व साहित्य घेऊन मंदिराकडे गेली. मात्र मंदिराच्या प्रवेशद्वारावरच तिच्यासमोर आलेलं सत्य ऐकून ती सुद्धा थक्क झाली. कारण गेल्या दोन वर्षांपासून शिर्डी साई मंदिरात (Shirdi Sai Mandir) हार फुले नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोना निर्बंध (Corona) लागले, तेव्हापासूनहा नियम लागू करण्यात आला आहे. मात्र प्रथमच आलेल्या या महिलेला याची कोणतीही माहिती नसल्याने तिला उशिरा हे लक्षात आलं. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर सदर महिलेने तात्काळ पुन्हा त्या दुकानात जाऊन पोलिसात जाण्याची इशारा दुकानदाराला दिला आणि हा इशारा देताच दुकानदाराने तात्काळ घेतलेले पैसे ऑनलाईन पद्धतीने त्यांना परत केले. दूरवरून आलेल्या असल्यामुळे व बरोबर वयस्कर आई व लहान मूल असल्याने पोलीस ठाण्यात अधिक काळ घालवण्यापेक्षा या महिलेने पोलिसात न जाता हा सगळा किस्सा मीडियासमोर मांडला.


कोविड काळापासून हार प्रसादवर बंदी


दरम्यान आम्ही 25 वर्षांपासून व्यवसाय करतो. भक्त श्रद्धास्थानी ठेऊन आम्ही काम करतो. मात्र काही व्यावसायिक भक्तांना लुटत असल्याचे समोर आलं आहे. शिर्डी नगरपालिकेने एजंट हद्दपार करण्याचा ठराव सुद्धा पूर्वीच केला आहे. मात्र आता पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्याची मागणी रवी गोंदकर व पंकज ओसवाल या व्यासायिकांनी केली आहे. कोविड काळापासून हार प्रसाद बंदी असून अशा वेळी भक्तांची फसवणूक होत असेल तर ते चुकीचे आहे. साईबाबा संस्थानने सुद्धा हार प्रसाद स्वीकारत नसल्याचे मोठे फलक लावले तर फसवणूक होणार नाही. शहरात सध्या एजंट मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत असून पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केली आहे. 


खासगी एजंटकडून साईभक्तांची लूट 


शिर्डी साईबाबांची नागरी असून वर्षभर भाविक दर्शनासाठी येत जात असतात. देशभरातून भाविक भक्त येत असल्याने साईबाबा मंदिर ट्रस्टकडून सातत्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातात. कोरोना काळातच भाविकांच्या सुरक्षेसाठी हार फुलांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र याचाच फायदा घेत काही एंजटकडून नवख्या भाविक भक्तांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी सुद्धा अनेकदा शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांची एजंटकरवी आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. दोन महिन्यांपूर्वी शिर्डीतील अनेक एजंटांवर पोलिसांनी कारवाई देखील केली होती. मात्र आता पुन्हा एकदा हे एजंट रस्त्यावर फिरताना दिसत असून शिर्डीत येणाऱ्या भक्तांची आर्थिक लूट पोलीस प्रशासन कारवाई करून थांबवणार का हेच पाहणं महत्त्वाचं आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


Shirdi Sai Darshan : शिर्डी साई भक्तांसाठी महत्वाची बातमी! पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य, काय आहे नवी नियमावली?