अहमदनगर : जगात वेगवेगळ्या पद्धतीची खाद्यसंस्कृती आणि तितकेच खवय्ये पाहायला मिळतात. आपला देश विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक 50 ते 100 किलोमीटरवर भाषा, संस्कृती, रूढी - परंपरा बदलते तशी खाद्यसंस्कृतीही बदलत जाते. पदार्थ तोच असतो, मात्र प्रत्येक भागात त्याची एक वेगळी चव आणि ओळख पाहायला मिळते. काही पदार्थ विशिष्ट चवीमुळे त्या भागाचे वैशिष्ट्य ठरतात. अशाच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी खाद्यसंस्कृती आहे आणि ती आपल्याला खाण्यातूनच अनुभवता येते. त्यातीलच चवदार 'शिपी आमटी'. त्यातल्या त्यात कर्जतची शिपी आमटी ही केवळ तालुक्यातच नाही तर जिल्ह्यातही प्रसिद्ध आहे.
कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, तरुण मंडळाच्या बैठका किंवा कुणी पाहुणे आले की 'शिपी आमटी'वर ताव मारण्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. कर्जतचे वेगळे वैशिष्ट्य असलेला हा 'मेन्यू' म्हणजे एक अफलातून प्रकार आहे. विशेष म्हणजे मटण, मासळी, चिकन यापेक्षाही स्वादिष्ट असलेल्या या प्रकाराला कर्जतमध्ये नियमित मागणी असते. पूर्वी केवळ गुरुवार आणि मंगळवार या वारीच मिळणारी ही शिपी आमटी आता दररोज इथल्या खानावळीत मिळते. त्याच्या स्वतंत्र खानावळी देखील इथे पाहायला मिळतात. अशा खानावळींच्या बाहेर 'शिपी आमटी स्पेशलिस्ट' असे फलक देखील लावलेले पाहायला मिळतात.
50 ते 100 रुपयांपर्यंत आमटीचे दर
या आमटीचा स्वाद घेण्यासाठी आवर्जून अनेकजण येतात, याचे पहिले कारण म्हणजे या आमटीचा अनोखा स्वाद आणि ही आमटी जिथे बनवली जाते त्या परिसरात सुटलेला तिचा घमघमाट. या घमघमाटामुळे खवय्यांचे पाय आपोआप खानावळीकडे वळतात. दुसरे कारण म्हणजे अतिशय माफक दरात ही आमटी मिळत असल्याने स्वादिष्ट आणि पोटभर जेवण मिळत असल्याने सर्व स्तरातील लोकांना हे परवडणारे असते. पूर्वी या आमटीचे ताट 50 रुपयांपर्यंत मिळत होते तेच ताट आता 100 रुपयांच्या आत मिळते, खानावळीनुसार त्याचे दर कमी अधिक आहेत.
आमटीसोबत भाजलेले शेंगदाणे, पापड, गुलाबजाम
प्रत्यक्षात आमटी बनवून झाली की तिचे दोन भाग असतात वर तर्री आणि खाली आमटी असते. ज्यांना तिखट खाण्याची सवय असते ते तर्रीसह आमटी खातात ज्यांना यातील तर्री काढून घेतली की सर्व तिखटपणा त्यातून जातो खाली स्वादिष्ट आमटीही राहते. मात्र ही आमटी तर्रीसह घेऊन त्यात भाकरी किंवा चपाती चुरून पुरके मारत , घाम पुसत खाण्याची मजाच काही और आहे. विशेष म्हणजे या आमटीमुळे दुसऱ्या दिवशी पोटाला कोणताही त्रास होत नाही. खाताना तिखट लागले तर शिपी आमटीसोबत भाजलेले शेंगदाणे, पापड, गुलाबजाम देखील असतात.
1965 पासूनची परंपरा
सध्या कर्जतमध्ये 'शिपी आमटी' बनवणाऱ्या तीन-चार खानावळी आहेत. तशी ती घरोघरीही बनवली जाते असं कर्जतकर सांगतात. जुने जाणकार सांगतात की, ही आमटी 1965 पासून बनवली जात आहे. कदाचित त्याच्या आधीपासूनही ही आमटी बनवली जात असू शकते मात्र याबाबत मतमतांतरे आहेत. जेव्हा वाहतुकीचे प्रमुख साधन बैलगाडी होते तेव्हा अनेक बाजारकरू बैलगाडीने विविध ठिकाणी फिरत असे, त्यावेळी त्यांचा गावांशी फारसा संपर्क येत नसेल मग मुक्काम पडेल तेथे तीन दगडाची चूल मांडून जवळचे डाळ आणि मसाले एकत्र टाकून फोडणी द्यायची की झाली तयार आमटी.
शिपी आमटी नाव कसे पडले?
हा प्रकार करमाळा तालुक्यातील कोर्टीच्या बाजारात हमखास बनवला जायचा असे वयस्कर लोक सांगतात.या आमटीचा घमघमाट सुटला की चर्चा व्हायची , त्यातून पुढे आमटी इतरांपर्यंत पोहोचली. पूर्वी ही आमटी बनवणारा शिंपी समाजाचा माणूस होता. म्हणून त्याला शिंपी आणि पुढे 'शिपी आमटी' म्हणून ओळखले जाऊ लागले लागल्याचे कर्जतकर सांगतात. पुढे जाऊन ही आमटी बनवताना अनेक सुधारणा झाल्या. त्यातील एक पद्धत म्हणजे तूर डाळ शिजवून घेणे जेवढी डाळ तेवढे तेल घेऊन मोहरी तडतडू लागल्यावर त्यात जिरे टाकणे आणि नंतर परतून घेतलेले कांदे - लसूण आले यांची पेस्ट कढीपत्ता टाकणे. हिंग, धने आणि मिरची पूड, काळा मसाला, कोथिंबीर यांची फोडणी बनवून चवीपुरते मीठ आणि आवश्यक तर साखर, तसेच या फोडणीत डाळ टाकून उकळून घेणे. पहिली उकळी आल्यावर स्वादिष्ट आमटी वाढायला तयार होते.
कर्जतची ओळख शिपी आमटी
पूर्वी बऱ्याच ठिकाणी फक्त आमटी दिली जायची. खवय्ये घरूनच तांब्या- वाटी चपाती किंवा भाकरी, भाजलेले शेंगदाणे आणि कांदा घरूनच आणायचे. यातून मिळणारा सह भोजनाचा आनंद अवर्णनीय होता. पुढे खानावळीत भरगच्च ताट मिळू लागले.कुणी परीक्षेत उत्तीर्ण झाले, कुणाला मुलगा झाला, कोणाचे महत्त्वाचे काम झाले, मुला मुलीचे नाव ठेवायचे असा कोणताही आनंदाचा क्षण हा 'शिपी आमटी' सोबतच सेलिब्रेट व्हायचा. आता कर्जतमध्ये कोणत्याही कामानिमित्त बाहेरून आलेल्या पाहुण्यांना 'शिपी आमटी' चा पाहुणचार ठरलेला असतो.कुणी नवीन अधिकारी बदलून कर्जतमध्ये आला तर त्याचा पहिला दिवस 'शिपी आमटी' नेच सुरू होतो.
हे ही वाचा :