अहमदनगर : राज्यात शांत आणि संयमी नेतृत्व अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat). मात्र ज्यावेळेस बाळासाहेब थोरात संतप्त होतात तो क्षण काहीसा वेगळा असतो. याला निमित्त ठरली ती संगमनेर शहरातील प्रांत कार्यालयात झालेली टंचाई आढावा बैठक. चार दिवसांपूर्वी सूचना देऊनही संगमनेरचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार त्यांच्या आढावा बैठकीला गैरहजर राहिले. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.


पाणी टंचाई आढावा बैठकीमध्ये अधिकारी गैरहजर 


राज्यातील बहुतांश भागात पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागात दुष्काळी परिस्थितीत निर्माण झाली आहे. तर अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होत चाललाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेर तालुक्यात बारा टँकरच्या माध्यमातून अनेक गावांना  पाणीपुरवठा होतोय. तर पाऊस नसल्याने दुष्काळाची स्थिती सुद्धा गंभीर आहे. याचाच आढावा घेण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर प्रांत कार्यालयात आढावा बैठकीचा आयोजन केलं होतं.


बाळासाहेब थोरात संतप्त


चार दिवसांपूर्वी नियोजित केलेल्या बैठकीला संगमनेरचे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार गैरहजर राहिले. बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात प्रवेश करतात तहसीलदार आणि प्रांताधिकारी उपस्थित नसल्याचे लक्षात येतात नायब तहसीलदारांना याबाबत विचारणा केली. तहसीलदार आणि प्रांत महसूल मंत्र्यांच्या गावी लोणी या ठिकाणी गेल्याचं त्यांना सांगण्यात आलं. इतक्या गंभीर विषयावर बैठक असताना अधिकाऱ्यांनी हजर राहायला हवं असं सांगत बाळासाहेब थोरात हे संतप्त झाले आणि त्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.


महसूल मंत्र्यांकडे तहसीलदार आणि प्रांताधिकारी 


या प्रकरणी बाळासाहेब थोरांताना प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आजच्या बैठकीला प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी हजर राहणं अपेक्षित होतं. चार दिवसांपूर्वी बैठक ठरली होती. मात्र महसूलमंत्री मतदारसंघात आल्याने तहसीलदार आणि प्रांत तिकडे गेले असं समजलं. आपण मतदारसंघात आल्यावर प्रांत, तहसीलदार समोर पाहिजे असं मंत्र्यांना वाटत असेल तर ते योग्य नाही. मीसुद्धा अनेक वर्षे महसूल मंत्रिपदाचा अनुभव घेतला आहे.


आजच्या बैठकीला अधिकारी हजर नाहीत ही नाराजी त्यांच्यापर्यंत पोहोचलवा, महसूलमंत्र्यांना सुद्धा नाराजी कळवली तरी हरकत नाही असा टोला बाळासाहेब थोरात यांनी विखेंचं नाव न घेता लगावला.


थोरात विरुद्ध विखे हा वाद राज्याला नवीन नाही. आजच्या बैठकीमुळे पुन्हा एकदा आजी-माजी महसूलमंत्र्यांमधील राजकीय संघर्ष समोर आल्याचं चित्र आहे. 


ही बातमी वाचा: