अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)  राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण देखील लागल्याचं चित्र आहे. अहमदनगरच्या बुरूडगावात (Ahmednagar Burudgaon Gram Panchayat) सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी तिरडीवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गुणरत्न सदावर्ते, छगन भुजबळ यांच्यासह राजकीय नेत्यांचे फोटो असलेला बॅनर बांधण्यात आला होता. या अंत्ययात्रेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला बुरुडगाव ग्रामपंचायतपासून सुरुवात झाली. गावातून निघालेली ही अंत्ययात्रा मुख्य चौकात आली. यावेळी राजकीय नेत्यांचे फोटो असलेल्या तिरडीला अग्नीडाग देण्यात आला. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी घेतली. या आंदोलनात महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.


त्या आधी मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून बुरूडगावातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले होते. त्यामध्ये लोकनियुक्त सरपंचाचाही समावेश होता. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अहमदनगरपासून जवळच असलेल्या बुरूडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी सामूहिक राजीनामा दिला आहे. 11 सदस्य संख्या असलेल्या 9 सदस्यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यात लोकनियुक्त सरपंचाचाही सहभाग आहे.


राजीनामा देणाऱ्या सदस्यांची नावं
सरपंच- अर्चना कुलट, 
उपसरपंच महेश निमसे, 
सदस्य- सिराज शेख, खंडू काळे, ज्योती कर्डिले,अक्षय चव्हाण, नयना दरंदले, शीतल ढमढेरे, रुख्मिणी जाधव, रंजना कुलट यांनी राजीनामा दिला आहे.


ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाचारणे आणि शालन क्षेत्रे हे दोन सदस्य देखील उद्या राजीनामा देणार आहे. तर बुरूडगावाने राजकीय नेत्यांना गावबंदी देखील केली आहे. दरम्यान बुरूडगाव येथे आज शांततेच्या मार्गाने कँडल मार्च देखील निघाला. या मार्चमध्ये लहानग्यांपासून महिला-पुरुषांनी सहभाग घेतला आहे.


बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी 


बीड शहर  प्रत्येक तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत त्यासोबतच जिल्ह्यातील प्रमुख नॅशनल हायवे वरती संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलन पेटलं असून सोमवारी दिवसभर अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आलं आहे. 


ही बातमी वाचा: