Ahilyanagar Leopard: अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला (Leopard) अखेर वनविभागाने (Forest Department) ठार करण्यात यश मिळवले. या बिबट्याने अल्पावधीत दोन जणांचा बळी घेतला होता, तर अनेकांवर हल्ले करून परिसरात दहशत निर्माण केली होती. यामुळे शेतकरी, ग्रामस्थ, ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

Continues below advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील ऊसतोड कामगाराच्या मुलीवर आणि येसगाव येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्याचबरोबर शिंगणापूरमध्ये एका मुलाला गंभीर जखमी केले होते. पशुधन, पाळीव प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात मारले असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला होता. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वनविभागाने कोपरगाव तालुक्यात मोठी शोधमोहीम हाती घेतली होती.

Ahilyanagar Leopard: बिबट्याला ठार करण्यात अखेर यश

बिबट्याला पकडण्यासाठी 100 हून अधिक वन कर्मचारी मोहीमेत सहभागी झाले होते. टाकळी, येसगाव, ब्राह्मणगाव परिसरात 15 पिंजरे लावण्यात आले होते. नाशिक आणि पुणे येथून विशेष पथके बोलावण्यात आली होती. 2 शार्प शूटर्स आणि तीन ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून शोधमोहीम सुरु होती. तर, नागपूर येथील प्रिन्सिपल चीफ कंजर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट यांनी बिबट्याला पकडण्यासाठी व गरज भासल्यास ठार करण्याची परवानगी दिली होती. यानंतर काल मध्यरात्रीच्या सुमारास धारणगाव शिवारात बिबट्याची हालचाल आढळल्यानंतर वनविभागाने विशेष पथकासह कारवाई सुरू केली आणि नरभक्षक बिबट्याला अखेर ठार केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

Continues below advertisement

Nanded Leopard: नगर, नाशिकनंतर नांदेडमध्ये बिबट्याची दहशत 

दरम्यान, नांदेडच्या वडेपुरी शिवारात काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर पुन्हा बिबट्या दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केलाय. त्यामुळे या भागात आता बिबट्याची दहशत पसरली आहे. गुरे राखण्यासाठी महिला आता एकत्रितपणे जात असून स्वरक्षणार्थ हाथात शस्त्र घेऊन जातायत. या भागांत बिबट्याचा वावर असल्याच्या पाऊलखुणा अनेक जागी आढळल्या आहेत. त्यामुळे डोंगराळ भाग असलेल्या या परिसरातील शेतात जाण्यासाठी गावकरी घाबरत आहेत. भीतीपोटी शेतातील कापूस वेचणी करायला देखील मजूर सापडेनासे झाले आहेत. तसेच शेतातील रब्बी हंगामाच्या पेरण्या रखडल्या आहेत. स्थानिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिता देवरे यांनी सोशल मीडियावर केलय.

आणखी वाचा 

Nashik Leopard Attack: एका बिबट्याने सात जणांना जखमी केलं, तोपर्यंत दुसरा बिबट्या आला पळा पळा अफवा पसरली; नेमकं काय घडलं?