Kopargaon Election 2025: अहिल्यानगर (Ahilyangar) जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिका (Kopargaon Nagarpalika) म्हणजेच काळे-कोल्हे यांच्यातील संघर्ष. विधानसभा निवडणुकीत या दोघांमध्ये समेट घडला आणि आशुतोष काळे विजयी झाले. मात्र, आता नगरपालिकेत काळे-कोल्हे पुन्हा एकदा एकमेकांना समोर उभे ठाकल्याने महायुतीतच लढत रंगणार हे निश्चित झाल आहे. भाजपच्या विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी नगराध्यक्षपदासह 21 उमेदवारांची यादी जाहीर करत आघाडी घेतली आणि आता राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी देखील राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन निवडणुकीत चुरस वाढवली आहे. एकीकडे काळे-कोल्हे गटाचे चित्र स्पष्ट झालेले असतानाच शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) आणि महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे.
Vivek Kolhe: विवेक कोल्हेंकडून पराग संधान यांना उमेदवारी
कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत महायुतीत सत्ता संघर्ष होणार हे चित्र आता स्पष्ट झाल आहे. भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी नगरपालिका निवडणुकीत पराग संधान यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली तर 21 उमेदवार देखील प्रभागातील जाहीर केले आहेत. अजूनही काही प्रभागातील उमेदवार निश्चित झाले नसून शिवसेना शिंदे गटाबरोबर बोलणे सुरू असल्याची माहिती विवेक कोल्हे यांनी दिली आहे.
Ashutosh Kale: आशुतोष काळेंकडून काका कोयटेंना उमेदवारी जाहीर
भाजपने नगराध्यक्षपद व उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अशितोष काळे यांनी देखील मोठी खेळी करत काका कोयटे यांना राष्ट्रवादीत घेऊन थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलीय. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर काका कोयटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.
Ashutosh Kale: विखे पाटील भाजपचे असले तरी...
शहर विकासाचे व्हिजन असलेले काका कोयटे यांना आम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करत असून लवकरच उर्वरित नगरसेवकांची यादी देखील जाहीर करणार असल्याची माहिती यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी दिली. तर विखे पाटील भाजपचे असले तरी ते जिल्ह्याचे पालक आहेत. त्यामुळे महायुतीच्या भविष्यातील विकास कामावर कुठलाही परिणाम होणार नाही, असं मत देखील आशुतोष काळे यांनी व्यक्त केले आहे.
Kopargaon Election 2025: शिंदे सेना व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झालेलं असताना अद्यापही शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडीची भूमिका गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या पक्षांकडून काय रणनीती आता आखली जाते? यानंतरच कोपरगाव नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
आणखी वाचा