अहमदनगर : मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे नाव बदलण्याची  मागणी केली जात होती. अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' (Ahilyanagar) करावे, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'अहिल्यानगर' झाल्याची घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केली होती. त्यामुळे जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला होता. मात्र आता नगरच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अहमदनदरमध्ये मुस्लीम समुदायाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना "अहिल्यानगर नको, अहमदनगर हवं", अशी मागणी केली आहे.


भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सतत अहमदनगरचे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' असे नामांतर करण्याची मागणी केली जात आहे. चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 298 व्या जयंती सोहळ्यात बोलताना देखील त्यांनी ही विनंती केली होती. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराची घोषणा केली होती.


अहमदनदरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी


आता शरद पवार हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना जामखेड येथील काही मुस्लीम बांधवांनी त्यांचा सत्कार केला. मात्र यावेळी मुस्लीम बांधवांनी आम्हाला "अहिल्यानगर" नको तर "अहमदनगर"च पाहिजे अशा घोषणाही दिल्या. त्यामुळे पुन्हा एकदा नगरच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यातील मुस्लीम समाजाने "अहिल्यानगर" नावाला विरोध केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. 


रेल्वेकडून 'अहिल्यानगर' नामांतरास हिरवा कंदील


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' करण्याचा ठराव महापालिकेतही (Ahmadnagar Municipal Corporation) मांडण्यात आला. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यानंतर काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला आहे. नामांतराबाबत सर्व प्रक्रिया केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारीत पूर्ण होत असल्‍याने प्रत्‍येक विभागाची ना हरकत आवश्‍यक असते. केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने नामांतराच्‍या बाबतीत हरकत नसल्‍याचे पत्र जारी केले आणि अहिल्‍यानगर नावास मान्‍यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्‍वेस्‍थानक देशात नसल्‍याचेही त्‍यांनी आपल्‍या पत्रात नमूद केले आहे. 


आणखी वाचा 


Nilesh Lanke : 'शाहांना म्हणालो तुमच्या या नेत्यांना पाडून आलोय', निलेश लंकेंनी सांगितला संसदेतील 'तो' रंजक किस्सा, जयंत पाटलांनाही हसू आवरेना!