Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298 वी जयंती (Punyashlok Ahilyadevi Holkar) आहे. यानिमित्ताने त्यांचे जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) चौंडी (Chaundi) इथे आज (31 मे) भल्या पहाटेपासूनच लगबग पाहायला मिळत आहेत. या जयंती सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia), इंदोरच्या होळकर संस्थानचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर (Yashwant Holkar) यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शासकीय जयंती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भाजप आमदार राम शिंदे यांनी पहाटे चौंडीतील महादेव मंदिरात अभिषेक केला आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलं.
अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातलं चौंडी हे अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ आहे. अहिल्यादेवींच्या 298व्या जयंतीनिमित्त चौंडी इथे आज शासकीय कार्यक्रम पार पडणार आहे. दुपारी पावणे एक वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
रोहित पवार यांच्याकडून मध्यरात्रीच जयंतीचा कार्यक्रम साजरा
एकीकडे आज अहिल्यादेवी होळकर यांच्या शासकीय जयंतीचा कार्यक्रम साजरा होत असताना काल मध्यरात्रीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जयंतीचा कार्यक्रम साजरा केला. या निमित्ताने रोहित पवार आणि राम शिंदे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. आज शासकीय पद्धतीने जयंती साजरी होत असताना त्याआधीच रोहित पवार यांच्यावतीने होर्डिंग लावून भाविकांचे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले आहे. प्रत्येक चौकात बॅनर लावलेले आहेत. दरम्यान भाजप आमदार राम शिंदे यांच्या आवाहनानंतरही दोन वेगवेगळ्या जयंती साजऱ्या होणार असल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे.
आजच अहमदनगरच्या नामांतराची घोषणा करा : अक्षय होळकर शिंदे
तर दुसरीकडे जयंतीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतो. परंतु अहमदनगरच्या नामांतराची घोषणा उद्याच करावी अशी मागणी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय होळकर शिंदे यांनी केली आहे.
वेगळा पायंडा पाडून आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये : राम शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कुणीही राजकारण करु नये. जयंतीचे स्टेज हे जयंतीचे स्टेज राहायला हवे ते राजकीय स स्टेज होऊ नये, असं त्यांनी म्हटलं होत. त्याबाबत बोलताना भाजप आमदार राम शिंदे यांनी आपण चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करताना कोणतेही राजकारण होऊ नये म्हणून निमंत्रण पत्रिकेत सर्वच विरोधी आमदारांचे नाव टाकली आहेत. मात्र काही लोक इथली प्रथा परंपरा बाजूला ठेवून कधी नव्हे तो वेगळा पायंडा पाडत असल्याने यावर विचारविनिमय झाला पाहिजे, असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे. आमदार रोहित पवार यांनी काल मध्यरात्रीच महादेव मंदिरात जाऊन अभिषेक केला त्यावरुन बोलताना कुणी वेगळा पायंडा पाडून आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, असं राम शिंदे म्हणाले