अहमदनगर : शेतकऱ्यांची तूर म्हणून व्यापाऱ्यांची तूर बाजार समितीत खपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या रॅकेटचा अहमदनगरमध्ये पर्दाफाश करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल बावीस लाखांच्या तुरीचे दोन ट्रक ताब्यात घेतले आहेत. शेतकऱ्यांकडून कमी दरात तूर घेऊन ती सरकारी हमी भावात विकण्याचा प्रयत्न होता. या रॅकेटमध्ये व्यापारी आणि पाथर्डी मार्केट यार्डातल्या लोकांचं संगनमत असल्याचाही संशय आहे.

मार्केट यार्डातून ट्रकच्या चालकांना बनावट सह्यांची पोहोच दिली होती. शिवाय पावतीवर गाडीचा क्रमांक चुकीचा होता. स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकला आणि चालकाला ताब्यात घेतलं.

चालकाने या रॅकेटमध्ये मार्केट यार्डचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांचा हात असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याअगोदरच दिला आहे.