बीड : कोणत्याही शहरातून अथवा गावातून फिरताना प्रत्येक मोबाईलच्या दुकानाबाहेर तुम्हाला वेगवेगळे फलक दिसले असतील. मात्र बीडच्या आष्टीमध्ये चक्क मोबाईलच्या दुकानाच्या बाहेर कुठे चिकन, साखर तर कुठे चक्क मोबाईलच्या कार्ड सोबत वडापाव फ्री असे बोर्ड लागले असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकीकडे मोबाईल इंटरनेट सुविधा असेल, कमी दरात कॉलिंग असेल अशा एक ना अनेक सुविधा देऊन खाजगी मोबाईल सिमकार्ड कंपनीवाल्यांनी ग्राहकांना आकर्षित केलेले असतानाच आता आष्टी शहरात एका मोबाईल दुकानदाराने चक्क मोबाईलचे कार्ड एका विशिष्ट कंपनीच्या नावाने पोर्ट करा आणि दोन किलो साखर अथवा अर्धा किलो चिकन मोफत मिळवा अशा आशयाचे फलकच दालनासमोर लावल्याने या फलकाची चवीने चर्चा होत आहे तर दुसरीकडे यामुळे ग्राहक देखील या स्किमच्या माध्यमातून दुकानात गर्दी करत असल्याचे चित्र आहे.

या स्किमचे कारण म्हणजे प्रत्येक व्यापार क्षेत्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या स्पर्धेमुळे मोबाईल कंपन्यांनी देखील आपण मागे का राहायचे म्हणून गत दोन वर्षापासून विविध स्किमच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित केलेले आहे. आज मोबाईल वापरणारांची देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. परंतु गेल्या तीन महिण्यांपासून याच कंपन्यांनी आपल्या दरामध्ये वाढ केल्याने अनेक ग्राहकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. आता एका विशिष्ट कंपनीत आपले दुसऱ्या कंपनीचे मोबाईल कार्ड पोर्ट करा आणि साखर अथवा चिकन मिळवा या अनोख्या फंडाने पुन्हा एकदा व्यावसायिक स्पर्धेला गती मिळाल्याचे चित्र आहे.

आष्टी शहरातील मोबाईल दुकानदारांच्या जम्बो ऑफर्सकडे ग्राहक आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. आपला मोबाईल नंबर एका कंपनीतून दुसर्‍या कंपनीत पोर्ट करण्यासाठी जणू या मोबाईल विक्रेत्यांमध्ये मोठी स्पर्धाच लागली आहे. यामुळे एका मोबाईल दुकानाच्या बाजूला असलेल्या चिकन सेंटरचाही धंदा वाढला आहे.

एक वेळ होती ज्यावेळी मोबाईलच्या कॉल सेंटरला बोलायला सुद्धा तासनतास वाट पाहावी लागायची. आता मात्र आमच्याच कंपनीचा नंबर घ्या असं सांगण्यासाठी मोबाईल दुकानदार चिकनची, वडापावची ऑफर देत आहे. मोबाईलचा नंबर न बदलता मोबाईल तर पोर्ट होतोच आहे पण त्यासोबत जर चिकन मिळत असेल तर हेही नसे थोडके.