प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, सांगा कसं जगायचं, जेव्हा तुझ्या बटांना यासारख्या पाडगावकरांच्या अनेक कवितांना रसिक वाचकांचं प्रेम लाभलं होतं. धारानृत्य, जिप्सी, भोलानाथ यासारख्या अनेक कवितासंग्रहांमुळे ते आबालवृद्धांचे लाडके झाले. पाडगावकरांची काव्यवाचनाची विशिष्ट शैली अनेकांना भावत असे.
पाडगांवकरांचा जन्म 10 मार्च 1929 रोजी वेंगुर्लामध्ये झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुईया महाविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवत होते.
1943 मध्ये त्यांनी पहिल्या कवितेचं लिखाण केलं. 1950 मध्ये धारानृत्य या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं. त्यानंतर जिप्सी, निंबोणीच्या झाडामागे, छोरी शर्मिष्ठा, उत्सव अशा अनेक काव्यसंग्रहांना रसिकांचं भरभरुन प्रेम मिळालं.
1980 मध्ये त्यांना 'सलाम' या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर 2013 मध्ये पद्मभूषणने त्यांचा गौरव करण्यात आला होता. याशिवाय महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कारही त्यांना मिळालं होतं. त्यांनी 2010 मध्ये विश्व साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
30 डिसेंबर 2015 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी मंगेश पाडगावकर यांनी मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
गाजलेल्या कविता :
- प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नि आमचं सेम असतं
- सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत कि गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा!
- जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
- शुक्रतारा, मंद वारा
- श्रावणात घन निळा बरसला
- सांग सांग भोलानाथ
- सावर रे, सावर रे, उंच उंच झुला