नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच लोकांशी बोलले. नरेंद्र मोदी म्हणाले की, आंदोलनांद्वारे तुम्हाला विरोध करायचाच असेल तर तुम्ही माझे पुतळे जाळून आंदोलन करा, पण हिंसाचार, शाकीय मालमत्तेची हानी तसेच गरिबांची वाहने जाळू नका, असे आवाहन मोदींनी केले. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या सभेत मोदी बोलत होते. रामलीलामधूनच मोदींनी आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.
मोदी म्हणाले की, माझ्या पुतळ्याला जोडे मारा, मला हव्या तितक्या शिव्या द्या, पण गोरगरिबांचे नुकसान करु नका. असे करुन तुम्हाला काय मिळणार आहे? असा भावनिक प्रश्न मोदींनी विचारला. देशभरात सुरु असलेल्या आंदोलनांवर, हिंसाचारावर बोलताना मोदींनी देशभरातील लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी सांगितले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा, कोणाचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी नव्हे, तर लोकांना नागरिकत्व देण्यासाठी आणला गेला आहे. मोदी म्हणाले की, या कायद्याच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना नवे आयुष्य मिळेल.
मोदी म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करून पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर तोंडावर पाडण्याची संधी आपल्या हातात होती. त्यांच्या देशात अल्पसंख्यांकावर सुरू असलेले अत्याचार जगासमोर मांडता आले असते. परंतु आमच्या विरोधकांनी ती वाया घालवली. कारण विरोधकांना देश नव्हे तर पक्ष महत्त्वाचा वाटतो,
NRC-CAA चा मुस्लिमांशी काही संबंध नाही -
एनआरसी आणि सीएए या दोन्ही कायद्याचा देशातील मुस्लीमांशी काहीएक संबंध नसल्याचे पंतप्रधान मोंदींनी आज सांगितले. ते म्हणाले, की नागरिकत्व कायदा आणि एनआरसी या दोन्हींचा या मातीत जन्मलेल्या मुस्लिमांशी काहीही संबंध नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हिंदू किंवा मुस्लिम असो, भारतातील कोणत्याही नागरिकासाठी नसल्याचे संसदेत सांगितल्याची आठवणही मोदींनी करुन दिली. देशात राहणाऱ्या 130 कोटी लोकांशी याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे काँग्रेस आणि शहरी नक्षलवाद्यांनी डिटेंशन सेंटरची पसरवलेली अफवा खोटी असल्याचे मोदी म्हणाले.