Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली आणि त्याची चर्चा सगळीकडे झाली. अनेकांनी आर्याच्या समर्थनार्थ पोस्टही केल्या. घरातल्यांनीही आर्याच्या हिंसेचं समर्थन केलं नाही पण तिची बाजूही घेतली. बिग बॉसने मात्र आर्याला चांगलाच झापलं. तसेच तिने हेतूपूर्वक हिंसा केल्याचंही बिग बॉसने म्हटलं. त्यातच आता आर्यासाठी एका मराठी अभिनेत्याची पोस्ट बरीच चर्चेत आली आहे.
अभिनेता अभिजीत केळकर हा देखील बिग बॉसचा स्पर्धक राहिला आहे. त्याने या घटनेवर भाष्य करत तिच्या हिंसेचं समर्थन केलं नाही पण तिच्या खेळाचं कौतुक केलं आहे. सध्या अभिजीतची ही पोस्ट बरीच चर्चेत आलेली आहे. दरम्यान आता भाऊच्या धक्क्यावर निर्णय घेत आर्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
अभिजीतची आर्यासाठी खास पोस्ट
आर्यासाठी सोशल मीडिया पोस्ट करत अभिजीतने म्हटलं की, 'आर्या, तुझं नडणं, तुझं भिडणं, एकटीनं खेळणं, सगळं आवडत होतं पण…हा खेळ संयमाचाही आहे, मानसिक संतुलनाचाही आहे. हिंसेचं समर्थन नाहीच करता येणार…पण माफी माग. तू जेन्यून आहेस, ते तुला नक्की एक संधी देतील.'
बिग बॉसने आर्याला झापलं
बिग बॉसने या घटनेवर भाष्य करताना म्हटलं की, निक्की आणि आर्यामध्ये झालेला वाद बिग बॉसने पाहिला आहे. यामध्ये बिग बॉसला असं कळालं आहे की, निक्की आक्रमक होऊन आर्याला धक्का दिला. पण आर्याने निक्कीला कानाखाली मारुन हेतूपूर्वक हिंसा केली आहे. आर्याने हे कृत्य करुन बिग बॉसच्या प्रमुख नियमाचं उल्लंघन केलं आहे. हे बिग बॉस कधीही खपवून घेणार नाही. या घटनेचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर घेतला जाईल आणि तोपर्यंत आर्या जेलमध्ये राहतील. तसेच भाऊच्या धक्क्यावर निर्णय देत बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं आहे.
'आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीस'
दरम्यान, एकीकडे निक्कीवर हात उचलल्यानंतर आर्याला बिग बॉसने शिक्षा दिली, तर दुसरीकडे नेटकऱ्यांचा आर्या पाठिंबा दिला. बिग बॉस प्रेमी आर्याच्या पाठीशी उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. आर्याने नियम मोडल्यामुळे तिला शिक्षा होणार असेल, तर अरबाजनेही नियम मोडलाय, त्यालाही शिक्षा व्हायला हवी, असं नेटकरी म्हणत आहेत. अरबाजनेही अभिजीतला धक्काबुक्की केली आणि जान्हवीचा हात पिरगळला.