गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील एका तरुणीची ही कथा आहे. उच्च शिक्षण,पुण्यातील चांगल्या पगाराची नोकरी सगळं सोडून या तरुणीनं स्वतःचा मध उत्पादनाचा व्यवसाय सुरु केला.
गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र इथल्याच एका तरुणीनं या जिल्ह्याला नवी ओळख मिळवून दिली. प्राजक्ता आदमने असं या तरुणीचं नाव. प्राजक्ताचं शिक्षण B.Pharm. MBA पर्यंत झालं आहे. पुण्यात एका बड्या कंपनीत ती नोकरी करत होती. मात्र काहीतरी नवीन करण्याची तिची इच्छा होती. तेव्हा तिने गडचिरोलीत मधोत्पादनाचा व्यवसाय सुरु करण्याचं ठरवलं. त्यासाठी दिल्लीहून रितसर प्रशिक्षणही घेतलं. आणि ‘कस्तुरी हनी’ हा स्वतःचा ब्रँड बाजारात आणला.
गडचिरोलीच्या जंगलांमध्ये वेगवेगळी झाडं आणि वनस्पती आढळतात. याचा फायदा प्राजक्तानं वेगवेगळ्या फ्लेवरचा मध तयार करण्यासाठी घेतला. जांभूळ, बोर, सूर्यफूल, लिची, तुळस, शिसम, निलगिरी अशा चवींच्या मधाची ती विक्री करते. सध्या प्राजक्ताकडे मधमाशांच्या 50 पेट्या आहेत. फक्त मधोत्पादनावर न थांबता, प्राजक्ता परागकण आणि बी वेनमचीही विक्री करते. यामुळे तिच्या मधोत्पादन उद्योगाला उभारी मिळाली.
100 ग्रॅम ते 1 किलोच्या बॉटल्समध्ये मधाची विक्री केली जाते. 60 रुपयांपासून 380 रुपयांपर्यंतच्या दराने ही विक्री होते. वर्षाला जवळपास 1 टन मधाची विक्री केली जाते. यातून प्राजक्ताला 6 ते 7 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं.
मध संकलनापासून पॅकिंगपर्यंत वर्षाला जवळपास 2 ते अडीच लाखांचा खर्च येतो. हा खर्च वाज जाता साडे तीन ते 5 लाखांपर्यंतचा निव्वळ नफा तिला मिळतो. मधोत्पादन हा उत्तम शेतीपूरक व्यवसायही आहे. त्यामुळे प्राजक्ता आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना मधोत्पादनाचं प्रशिक्षणही देते.
वेगवेगळ्या फ्लेवरचे मध आरोग्यासाठी फायद्याचे आहेत. शिसमचे मध हृदयरोगासाठी, तर जांबळाचं मध मधुमेहासाठी फायदेशीर ठरतं. निलगिरीचं मध सर्दी- खोकल्यासाठी, तर ओव्याचं मध पचनक्रियेसाठी गुणकारी मानलं जातं. अशा आयुर्वेदीक फायद्यांमुळे प्राजक्ताच्या कस्तुरी हनीला मागणी वाढतेय. नोकरीच्या मागे न धावता प्राजक्तानं स्वतःचा मधाचा ब्रँड तयार केला. शेती क्षेत्रात काहीतरी नवं करु इच्छीणाऱ्या तरुण-तरुणींसाठी प्राजक्ताची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे.
VIDEO: