सांगली: काही माणसांना शब्दांनी बोलता आलं नाही तरी त्यांचं कामच बोलतं. सांगलीचे निलेश आणि योगेश पवार हे जुळे बंधू अशांपैकीच एक. जे मिळालं नाही त्याबद्दल खळखळ न करता, जे आहे त्याचा चांगला वापर ते करत राहिले, परिस्थितीशी लढत राहिले, शिकत राहिले, पुढे जात राहिले.

कर्नाळ गावातील हे दोघे कर्णबधीर बंधू आपला छोटासा दुग्धव्यवसाय सांभाळतायत, काय वेगळेपण आहे त्यांचं , त्याचा हा आढावा.

जन्मत: कर्णबधीर जुळं

सांगलीतील कर्नाळ येथील जुळी कर्णबधीर भावंडे निलेश आणि योगेश. जन्मताच कर्णबधीर असल्यानं त्यांना आजही नीट बोलता येत नाही. अशा दुहेरी अपंगत्वाशी त्यांनी दोन हात केलेत. आज कर्नाळ इथं ते एक उत्तमरित्या जनावरांचा गोठा सांभाळत आहेत. यातून त्यांना महिन्याला ते 15  ते 20 हजार रुपयाचा निव्वळ नफा होतोय.

सांगलीचे राजाराम पवार महानगरपालिकेतून सेवानिवृत्त आहेत . त्यांना तीन अपत्य. थोरला गणेश आणि दोन जुळी मुलं म्हणजेच निलेश  आणि योगेश. हे दोघेही सव्वा महिन्याचे असताना कर्णबधिर असल्याचं पवार कुटुंबियांच्या लक्षात आलं.

तेव्हापासून दोघांच्या कानात मशीन बसवले. असं असलं तरी  त्याचा फारसा उपयोग झाला नाही.



अशा परिस्थितही त्यांचं दहावी पर्यंतचं शिक्षण आई - वडिलांनी पूर्ण केले . हातवारे करण्यापेक्षा त्यांनी लीप मूव्हमेंटवरच भर दिला.

त्याआधारे निलेश आणि योगेश काम करतात. पवार कुटुंबीयांची 2 एकर शेती कर्नाळ इथं आहे. एक दोन दुभती जनावरे असल्यानं आई वडील त्यांना लहानपणापासून शेताकडे न्यायाचे. यातूनच ही भावंडं निरीक्षणाने कामं करायला शिकली.

निलेश आणि योगेशला दहावीपर्यंतचं शिक्षण दिलं असलं तरी आता त्यांचं पुढे काय? हा मोठा प्रश्न पवार कुटुंबियांच्या समोर होता. दररोज शेताकडे  येत असल्याने, दोघांनाही जनावरांचा लळा लागला आणि गेल्या चार पाच वर्षांपासून दोघेजण 7 गाई आणि 3 म्हशी सांभाळत आहेत.

सकाळी 7 वाजता वडील त्यांना गोठ्याकडे घेऊन येतात. त्यानंतर गोठ्याची स्वच्छता, धारा काढणे, शेतातून हिरवा चारा कापून आणणे, त्याची कुट्टी करून जनावरांना खाऊ घालणे, पाणी पाजणे . धुणे अशी कामे दोघेही सहजरित्या करतात. त्यांचा मोठा भाऊ गणेशही  त्यांना कामात मदत करतो.

गाईंचं दूध डेअरीला घातलं जातं आणि म्हशीच्या दुधासाठी रतीब लावला आहे. हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून नुकतंच हायड्रोफोनिक्स युनिट त्यांनी बसवलं आहे.

यामध्ये मका बियाणं टाकणं, तापमान नियंत्रित ठेवणं आणि तयार झालेला चारा जनावरांना खाऊ घालणं, असं सकाळी 7 वाजलेपासून ते साडे नऊ वाजेपर्यंत कामात मग्न असतात. परत सायंकाळी चार वाजलेपासून त्यांची गोठ्यात कामाला सुरुवात होते. स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या या तरण्याताठ्या मुलांना पाहून आई - वडिलांना अभिमान वाटतो.

आजच्या घडीला सकाळ आणि संध्याकाळचं मिळून गाईचं 40 लिटर आणि म्हशीचं 10 लिटर दूध मिळतं. गाईचं संपूर्ण दूध डेअरीला घातलं जात आणि म्हशीचं घरी 3 लिटर दूध घरी ठेवलं जातं, उर्वरित सात लिटर दूध रतिबाने 50 रुपये लिटर याप्रमाणे विक्री केली जाते.

गाईच्या दुधाच्या विक्रीतून दिवसाला एक हजार रुपये आणि म्हशीच्या दुधाच्या विक्रीतून 350 रुपये असे दिवसाकाठी 1300 ते 1400 रुपये मिळतात.

महिन्याकाठी 40 हजार रुपये दुधाच्या विक्रीतून त्यांना मिळतात. 50 टक्के उत्पादन खर्च वजा जाता 15 ते 20 हजार रुपये शिल्लक राहतात.

निलेश आणि योगेशचे काम पाहून नुकतीच सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.  कृषी विभागानेही राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून हायड्रोफोनिक्स युनिटसाठी सहा हजार रुपयांचं अनुदान देऊ केलं आहे.

समाजापुढं  आदर्श निर्माण करणाऱ्या या दोघांना शेतीचं तंत्रज्ञान देण्याचं आव्हान कृषी विभागानं स्वीकारलं आहे.

खरं तर अशा मुलांना लहानाचं मोठं करणं म्हणजे आई - वडिलांची कसोटीच असते.  त्यांना समाजाच्या प्रवाहात आणणं म्हणजे मोठं कठीण काम . यातूनही जिद्द न हारता पवार कुटुंबियांनी निलेश आणि योगेशला दुग्ध व्यवसायाची आवड निर्माण करून दिली आणि आता ते दोघे स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.


VIDEO-


                      चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कर्नाळ, सांगली.