अमरावती: एक फोन आणि घरपोच ताजी भाजी... व्यवसायाचा हाच फंडा घेऊन अमरावतीतील एका उच्चशिक्षित अभियंत्यानं भाजीपाल्याचा व्यवसाय सुरु केलाय.


अमरावतीतील दर्यापूरचा महेंद्र टेकाडे हा अभियांत्रिकीचा पदवी धारक, पदवीनंतर काही काळ नोकरी केली,मात्र घरची शेती पुन्हा गावाकडं घेऊन आली. मोठ्या व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा शेतीतील मालाचं ब्रान्डिंग करण्याचं ठरवलं. आणि हा व्यवसाय उभा राहिला.

व्यवसाय उभारणीपूर्वी महेंद्रनं शहरातील 500 घरांमध्ये सर्व्हे केला. कुटुंबांची रोजची भाजीची गरज जाणून घेतली. आणि त्यांच्या गरजेनुसार भाजी पुरवण्याचं नियोजन केलं.

ग्राहकाच्या गरजेनुसार रोज भाजीपाल्याचं नियोजन केलं जातं. शेतकऱ्यांकडून भाजी विकत घेतली जाते. ही भाजी महिला स्वच्छ करतात. ग्राहकांच्या गरजेनुसार भाजीच्या पिशव्या भरल्या जातात. ही भाजी ग्राहकांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी वातानुकुलित व्हॅन आणि दुचाकी आहे. ज्याव्दारे ही भाजी थेट ग्राहकाच्या घरात पोहचते.

9 महिन्यापूर्वी 500 ग्राहकांपासून सुरु केलेला भाजी बाजार आज दीड हजार ग्राहकांपर्यंत पोहचलाय. महेंद्रनं 13 युवक आणि युवतींना रोजगार दिलाय. तर कित्येक शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाचा योग्य दर मिळतोय. महेंद्र या व्यवसायातून दररोज 8 ते 9 हजार रुपये कमावतोय. म्हणजेच महिन्या अडीच लाखांची उलाढाल.

उच्च शिक्षण घेऊनही हातात तराजू धरणं महेंद्रला कमीपणाचं वाटलं नाही. त्याला फक्त एक व्यवसाय उभारणीची संधी दिसत होती. अवघ्या नऊ महिन्यात महेंद्रनं स्वयंरोजगारतून स्वत: ची आर्थिक उन्नती साधली, शिवाय इतरांच्या हातालाही काम दिलंय.