नाशिक : आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नकारात्मक गोष्टींकडे न पाहता नाशिक जिल्ह्यातील मेहुण गावच्या देवरे कुटुंबानं एक आदर्शच शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.

ग्रामीण भागात शेती, दुग्धव्यवसाय डबघाईला गेल्याची चर्चा सुरु असतानाच केवळ दुग्ध उत्पादन करुन देवरे कुटुंबानं वर्षाला 36 लाख रुपयाची कमाई करण्याची किमया साधली आहे.



वसुबारसाच्या दिवशी गोधनाचं महत्त्व अनन्य साधारण असतं. याच गोधनामुळे नाशिक जिल्ह्यातील मेहूण गावच्या देवरे कुटुंबानं प्रगती साधली आहे. केवळ दुग्ध उत्पादनातून या कुटुंबाला वार्षिक 36 लाखांचं उत्पन्न मिळतं.

३० एकर शेती असूनही दुष्काळामुळे उत्पन्न मिळंत नव्हतं. अशा परिस्थितीत या कुटुंबानं दुग्ध व्यवसायाचा पर्याय शोधला आणि आज ते वर्षाला जवळपास ३६ लाखांचं उत्पादन मिळवत आहेत.



मालेगाव तालुक्यातील मेहुण गावात समाधान, बाळू आणि अनिल या देवरे बंधूंची वडिलोपार्जित शेती आहे. २०११ साली त्यांनी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी बँकेकडून २५ लाखांचं कर्ज घेतलं. यातून दीड एकरात८ लाखांना त्यांनी शेड उभारल्या आणि उरलेल्या पैशात गाई आणि म्हशींची खरेदी केली.

एकत्र कुटुंबामुळे प्रत्येकाचं या व्यवसायात काही ना काही योगदान असतं. आज देवरे कुटुंबाकडे एकूण ६० गाई आणि म्हशी आहेत. यात गाईच्या जर्सी तर म्हशीच्या मुर्हा आणि जाफराबादी जातीचा समावेश आहे. या कुटुंबाचा दिनक्रम त्यांच्या पशुधनासोबत सुरु होतो. त्यांना पाणी देण्यासाठी ऑटोमॅटिक सिस्टिमचा वापर होतो. गाईंचं दूध मशीनद्वारे काढलं जातं. तर म्हशींचं दूध हातानं काढतात. गुरांना सकाळ संध्याकाळ ओला आणि सुका चारा दिला जातो. त्याबरोबरच ज्वारी,बाजरी आणि मका यांचा भरडा ओला करुन दिला जातो.



जनावरांच्या रोजच्या खाद्यासाठी १० हजार रुपये खर्च येतो. दिवसाला दररोज जवळपास साडेपाचशे लिटर दूध मिळतं. या दुधाची ३६ रुपये लिटरनं विक्री होते. यातून सुमारे रोजचे २० हजार रुपये मिळतात. यातून खर्च वजा जाता महिन्याला या कुटूंबाला तीन लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. तर वर्षाला छत्तीस लाख रुपये मिळतात. त्यातून बँकेचा हफ्ता फेडला तरी २४ लाख रुपये वर्षाकाठी शिल्लक राहतात.



शेतीतील कमी उत्पन्नामुळे खचून न जाता या कुटुंबानं दुग्ध व्यवसाय केला. एकत्रितपणे काम करत या व्यवसायाला मोठं केलं. आता या व्यवसायाचा व्याप आणखी वाढवण्याचा त्यांचा मानस आहे. देवरे कुटुंबानं या व्यवसायातून शेतकऱ्यांसमोर एक चांगलं उदाहरण निर्माण केलं आहे.

VIDEO :