जालना : महसूल विभाग आणि पोलिसांनी 1 हजार 694 तुरीची पोती जप्त केली आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदी केंद्रावर गेल्या 10 दिवसांपासून बेवारसपणे असलेली पोती प्रशासनाने जप्त केली.

या तूर खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर ही तूर होती, त्यांच्या नावाचा पुकारा करुन देखील ते शेतकरी येत नसल्याने ही तूर संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. 15 दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील चार तूर खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची तसेच पर राज्यातील तूर येत असल्याच्या तक्रारी होत्या.

या अनुषंगाने राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी या प्रकरणी महसूल बरोबरच पोलीस चौकशीचे देखील आदेश दिले होते. गेल्या 8 दिवसांपासून तुरीच्या 3 हजार 500 पोत्यांच्या छाननीनंतर जवळपास 1694 पोती संशयित असल्याने प्रशासनाने त्यावर जप्तीची कारवाई केली.

जप्त करण्यात आलेल्या तुरीची नोंद 37 जणांच्या नावावर असून आता ते नोंदणीकृत शेतकरी कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र जप्त करण्यात आलेल्या तुरीचा वाली कोण, याचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.