मुंबई: राज्यातील खारेगाव टोलनाका आज मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. भिवंडी बायपासवरील खारेगाव टोलनाका हा मुदत संपून बंद होणारा पहिला टोल नाका असेल.
मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्याची उभारणी आणि तिच्या देखभालीचा खर्च वसूल झाल्याने राज्यसरकारनं 13 मेच्या मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार हा टोलनाका आता बंद होणार आहे.
हा टोलनाका बंद होणार असल्यानं या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे पैसे आता वाचणार आहेत. तसंच टोलनाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही प्रवाशांची मुक्तता होणार आहे. दरम्यान यानिमित्त काल (शुक्रवार) या टोलनाक्यावर मनसेकडून गुलाबचे फूल आणि पेढे वाटप करण्यात आले. या टोलनाक्याप्रमाणे इतरही टोलनाके बंद करण्याची मागणी मनसेनं केली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील या रस्त्याची उभारणी आणि त्याच्या देखभालीचा खर्च वसूल झाल्यानं हा टोलनाका बंद करण्याचा निर्णय आयआरबीनं घेतला आहे. 1998 साली हा टोलनाका उभारण्यात आला होता.
तेव्हापासून रस्त्याची उभारणी आणि देखभालीच्या खर्चाचे 180 कोटी रुपये कंपनीला वसूल करायचे होते. प्रत्यक्षात कंपनीनं यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं वसुली केल्याचं सांगत सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी टोलनाका बंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळालं आहे. टोलनाका बंद होणार असल्यानं वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या:
खारेगाव टोलनाक्याचा झोल उघड, 13 पट नफा कमवूनही वसुली सुरुच