गोष्ट गोव्यात घडते.


ख्रिसमसची आदली रात्र असते. गोव्यातून एक गुंड तुरूंगातली शिक्षा भोगून बाहेर येतो. आणि आल्या आल्या एका ज्येष्ठ पोलिसाला सांगून ठरवून एकेके पोलिसांचा खात्मा करायला लागतो. इतर सगळे पोलीस त्याच्या मागे आणि तो ठरवलेल्या प्रत्येकाचा खात्मा करू लागतो. का करतोय तो हे खून.. ही त्याने हेरलेली माणसं कोण आहेत? मारण्याआधी त्याने पोलिसांना ही बातमी का कळवली? या सगळ्याची उत्तरं क्रमाक्रमाने आपल्याला मलंगमध्ये मिळत जातात.

आता ही एकदा गोष्ट ठरली की दिग्दर्शक मोहित सूरी आपल्या वकुबाप्रमाणे ही गोष्ट अधिक जलद, गुंतागुंतीची करण्याचा प्रयत्न करतो. ते करताना नेहमीचा पटकथेचा फॉरमॅट न वापरता नॉन लीनीअर म्हणजे, आज आत्ता.. आणि पूर्वी.. अशा क्रमाने त्यात दृश्य पेरत जातो. उत्तरार्धात हा लपंडाव एक होतो आणि वर्तमानात येतो. मग आपल्याला हा मुलगा गुंड कसा झाला.. तो का मारतोय वगैरे कळत जातं.. त्याचा हा सिनेमा मलंग.

मुळात अशा प्रकारच्या गोष्टी नव्या नाहीत. फ्लॅशबॅकमध्ये खेळता खेळता एकदम वर्तमानात येणं आणि वर्तमानातून अचानक भूतकाळात जाणं यामुळे गुंतागुंत होण्याऐवजी कन्फ्युजन होतं. अर्थात इथे फार गोंधळ नाहीय. कारण गोष्टीचा जीव साधा आहे. आदित्या रॉय-कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्या मुख्य भूमिका आहेत यात. मराठी कलाकारांमध्ये अमृता खानविलकर, प्रसाद जवादे ही मंडळीही आहेत. सिनेमाची श्रीमंती मोठी आहे. पूर्वार्ध खिळवून ठेवतो. त्यामुळेच उत्तरार्धाकडून अपेक्षा वाढतात. कारण अनेक प्रस्न पूर्वार्धात निर्माण होणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्याची उत्तरं पुढे कशी मिळतात.. त्यातून काही धक्के बसतात का.. या सगळ्यावर उत्तरार्ध अवलंबून असतो. मलंग या उत्तरार्धात कमी पडतो.

कलाकारांची कामं तुफान आहेत. दिशा पटानीला घेतल्याने तिच्याकडून दिसण्याच्या ज्या अपेक्षा प्रेक्षक करतो त्या सगळ्या ती पूर्ण करते. सोबत आदित्य रॉय-कपूरही देखणा आणि उमदा आहे. पूर्वार्धात काहीवेळा जिंगदी ना मिलेगी दोबाराची आठवण येते. पण काही काळापुरती. संगीत कडक जमलं आहे. मलंगची गाणी यापूर्वीच तरूणाईच्या गळ्यात बसली आहेत. बाकी सगळं उत्तम असूनही केवळ कथा उलगडत जाणारी पटकथा यांनी निराशा केल्यामुळे सिनेमा उत्तम दिसत असला तरी सिनेमा पाहूनही हूरहूर वाटत राहते.

पिक्चर-बिक्चरमध्ये आपण या सिनेमाला देतो आहोत दोन स्टार्स. दिशा पटानी, आदित्य रॉय-कपूर, अनिल कपूर यांना पाहण्यासाठी सिनेमा पाहायचा असेल तर या एकदा जाऊन थिएटरमध्ये. नेत्रदिपक आहे.. पण चित्तवेधक नाही.