एक डिस्को थेक तो तिच्याकडे निरखून पाहातोय. त्याला ती आवडते. तिलाही ते कळतं. ती त्याला बोलावते. दोघे जवळ येतात. डिस्कोच्या थेकवरून बाहेर पडतात. गाडीवरून तो तिला आपल्या रूमवर नेतो. दोघामध्ये जवळीक निर्माण होते पण इतक्यात.. तो सावरतो. का? तो म्हणतो, तू मला आवडतेस.. पण आता जे आपण करू ते मी कुठल्याही मुलीसोबत करू शकतो. ती चिडते. उठून निघून जाते...


दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तिचा शांतपणे पाठलाग करतोय. तिला कुठलाही त्रास नाही. कसलाही उपद्रव नाही. कसलाही राग नाही. अपेक्षा इतकीच की ती कधीतरी कोणत्याही भावनावेगात न येता आपणहून समजून उमजून आपली होईल....

ती म्हणते, मला तुझ्यासोबत एकरूप व्हायचं होतं. पण तू त्याला नकार दिलास. आता का पाठलाग करतोयस? काय हवंय तुला? तो म्हणतो, मला तू हवीयस. पण तू माझ्यावर चिडू नको. मला तुला त्रास द्यायचा नाहीय. कारण, माझ्या असण्याने तुला त्रास होणार असेल तर माझ्या तुझ्यासोबत असण्याला काय अर्थ?..

तिला करिअर करायचं असतं. मुलाखतीची वेळ येते. सगळी आवराआवर करून ती मुलाखतीला जाते. पण मुलाखत देताना, इम्प्रेसिव उत्तरं द्यायच्या ऐवजी तिला वाटेल तशी खरी उत्तरं देऊन येते. चान्स जातो. तो म्हणतो, तू नाराज होऊ नको. तुला जी वाटली ती उत्तरं तू दिलीस हे खरं. ती म्हणते, मी चान्स घालवला. इम्प्रेसिव्ह उत्तरं द्यायच्याऐवजी मी वाट्टेल ते बोलले. तो म्हणतो, तेच तर हवंच. तू आज जशी आहेस बिनधास्त तीच खरी आहेस. (इथे त्यांनी बिच हा शब्द वापरला आहे.) तू जी आत आहेस तीच बाहेर असायला हवंस...

ती त्याच्यासोबत अफेअर आणि लग्न करायचं ठरवते. करिअर नंतर आधी लग्नाचा निर्णय घेते. त्याच्या घरी कार्यक्रम ठरतो. पण तिची आई तिला समजावते. स्वत;च्या पायावर उभं राहायचा सल्ला देते. मुलीने कसं आपापलं कमावतं असायला हवं याचे डोस तिला तिची आई देते. 'कार्यक्रम' रद्द होतो. आणि कालांतराने ती ज्या फर्ममध्ये काम करत असते त्याच्या अतिश्रीमंत फॅमिलीचं स्थळ तिला येतं. मग आई लगेच लग्नाचा आग्रह धरते. ती म्हणते, आता मी लग्न केलं तर चालेल? आता माझ्या करिअरशी तडजोड केलेली चालेल?..

एका दुसऱ्याच मित्रासोबत ती पार्टीला जाते. खूप दारू पिते. खूप पिते. तो मित्र तिला गाडीत घालतो आणि आपल्या रूमवर न्यायला लागतो. ती तशातही आपल्याला घरी सोडायला सांगते. मित्र तिला गाडीतून जागेवर उतरवतो. मध्यरात्री ही मुलगी 'त्याला' फोन लावते. तो तातडीने येतो. तिला घेऊन तिच्या घरी सोडतो. तिला शांत झोपवतो. ती त्याला जवळ घेते. पण तो पुन्हा सावरतो. तो म्हणतो, मी तुला आधार दिला म्हणून तू माझ्याजवळ येतेयस. ते नकोय मला. तू जशी आहेस. आतून बाहेरून खरी खरी तशी संपूर्ण ये. मला भावनावेग नकोय. मला प्युअर हवंय काहीतरी....

सिनेमातले हे काही प्रसंग. इम्तियाज अलीचा नवा सिनेमा लव आज कलमधले. एकीकडे मुलगी जुई करिअर की प्रेमच्या कात्रीत अडकली आहे. अर्थात तिचे आपापले फंडे क्लिअर आहेत. आधी करिअर आणि रिलेशनशिपमध्ये न अडकता अफेअर आणि पु्न्हा आपलं काम. असं सुरू असताना तिला पूर्णत: आपलं बनवण्यासाठी तयार असलेला प्रियकर रघू यांची गोष्ट या सिनेमात आहे. हा काळ आजचा आहे. ही तरूणाई आजची आहे. तर यात तुकड्यातुकड्याने आपल्याला दिसते वीरची गोष्ट. 1990 मध्ये जेव्हा मैने प्यार किया ऐन जोरावर होता तेव्हा हा वीरही विशीत होता. त्याचंही प्रेम होतं एकीवर. मग या दोन गोष्टी आळीपाळीने आपल्यासमोर येतात. प्रेम हे शरीर, भावनावेग यांच्या पलिकडचं काहीतरी असतं हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. अर्थात, जे तुमचं असतं ते तुमच्यापर्यंत येतंच असं सांगाणारा हा चित्रपट.. गेल्या पिढीच्या अनेक विचारांना आव्हान देत सिनेमा पुढे जातो. माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण नेहमी आपण 2 अधिक 2 म्हणजे चार करत असतो. पण माझा प्रयत्न दोन अधिक दोन हे चारपेक्षा अधिक काहीतरी असायला हवं असा आहे हे जेव्हा कळतं तेव्हा याची गोष्ट लक्षात येते.

सोपी भाषा.. सोपे संवाद. अर्थात कार्तिक आर्यन, सारा अली खान यांना चोख अभिनय यातून सिनेमा उलगडत जातो. साराचा वावर थक्क करणारा आहे. तीच गत कार्तिकची. रॉकस्टारमधल्या रणबीरची आठवण अधेमधे यावी. उत्तम संगीत. तितके उत्तम काव्य. मै हू गलत हे गाणं तुफान झालं आहे. श्रीमंती थाट. सिमॉन सिंग, रणदिप हुडा हेही दखलपात्र.

नाही म्हणायला, शेवटी शेवटी जरा गल्लत होताना दिसते. आपल्या जुन्हा आठवणी सांगताना जेव्हा वीर भावनावश होतो तिथे गाडी घसरल्यासारखी वाटते. घडून गेलेल्या गोष्टीवर तितकंच तटस्थ व्यक्त होणं कमाल भारी वाटलं असतं असं वाटून जातं. अर्थात, प्रेम हे शरीरापलिकडे असतं. आणि जे तुमचं असतं ते तुमच्यापर्यंत येतंच हे यापूर्वीही अनेकदा सांगून झालं आहे. इम्तियाज भाऊंची सांगण्याची पद्धत वेगळी आहे आणि कलाकारांनी त्याला वेगळी उंची दिली आहे म्हणून पैसे फिटतात. पिक्चरबिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत तीन स्टार्स. सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायला हरकत नाही.