मुंबई : देशभरात लॉकडाऊनमुळे सिनेमांचं, मालिकांची शूटिंग गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प आहे. लॉकडाऊनदरम्यान सिनेनिर्माते आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये शुटिंग सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. सिनेनिर्मात्यांची संघटना प्रोड्यसर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या सदस्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक व्हर्च्युअल मीटिंग झाली. यानंतर प्रोड्यसर्स गिल्ड ऑफ इंडियाने 37 पानांची गाईडलाईन जारी केली. यामध्ये शुटिंगदरम्यान काय काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मात्र शुटिंग दरम्यान या नियमांचं पालन करणे इतकं सोपं होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


काय आहेत गाईडलाईन्स?

  • सेटवर उपस्थित प्रत्येक क्रू मेंबरला त्रिस्तरीय मास्क आणि हँड ग्लोव्ह्ज घालावे लागणार.

  • एन्ट्री आणि एक्झिट पाॉईंटव्यतिरिस्त शुटिंगदरम्यान सर्वांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी.

  • कॉन्टॅक्ट थर्मामीटरच्या सहाय्याने सेटवरील सर्वांचं रोज तापमान चेक करावं लागणार.

  • स्टुडिओला शुटिंग आधी आणि नंतर सरकारी अधिकृत एजन्सीद्वारे सॅनिटाईज करावं लागणार.

  • शुटिंगमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने एकमेकांपासून सुमारे दोन मीटर अंतर राखले पाहिजे.

  • सेटवरील कोरोना संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचं निरीक्षण करण्यासाठी लोकांची नियुक्ती करावी.

  • शुटिंग दरम्यान रुग्णवाहिकेची व्यवस्था.

  • सेटवर 3 महिन्यांसाठी दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कनिष्ठ स्तरावरील डॉक्टरांची नेमणूक करावी.

  • शुटिंगशी संबंधित सर्व उपकरणांवर वारंवार निर्जंतुकीकरण करण्यावर भर द्यावा.

  • संपूर्ण सेट वेगवेगळ्या झोनमध्ये विभागला जाईल आणि प्रत्येक झोनमध्ये 15 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार नाहीत.

  • एका झोनमधून दुसर्‍या झोनमध्ये कोणालाही जाऊ दिले जाणार नाही.

  • शुटिंग सुरु होईपर्यंत कलाकार आपापल्या खोल्यांमध्येच राहतील.

  • कलाकारांच्या स्टाफ सदस्यांना केवळ आपत्कालीन परिस्थितीत सेटवर येण्याची परवानगी असेल.

  • सेटवर अनावश्यक व्यक्तींच्या येण्यावर बंदी असेल.

  • जे मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणार नाहीत त्यांना शुटिंगमध्ये भाग घेता येणार नाही.


यावर बोलताना प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष मनीष गोस्वामी यांनी म्हटलं की, परिस्थिती वेगाने बदलत आहे. सद्यपरिस्थितीत आपल्या सर्वांना शूटिंगचे नवे मार्ग अवलंबले पाहिजेत. लोकांना या गोष्टी व्यावहारिक वाटत नसतील पण बदललेल्या काळानुसार आपण पुढे गेलं पाहिजे. सर्वकाही शक्य होईल यासाठी प्रयत्न करूयात.


इंडियन टेलिव्हिजन अँड फिल्म प्रोड्युसर्स काऊंसिचे अध्यक्ष जे. डी. मजीठिया म्हणाले की, ज्या काही गाईडलाईन्स बनतील त्यातील 60-70 टक्के समान असतील. त्यांच्या समन्वयानुसार काम करावे लागेल. आमच्या संस्थेच्या वतीने गाईडलाईन बनवण्याच काम सुरु आहे. त्या गाईडलाईन राज्य सरकारसमोरही सादर करू. आपल्याला बदललेल्या परिस्थितीत काळजी घ्यावी लागेल.