Ghar Waapsi Review : रोज 9 ते 5 काम करणे, मेसमधून आलेला डबा खाणं आणि हॉस्टेलमध्ये जाऊन झोपणे असं आयुष्य काही तरुणांचे झालं आहे. आई-वडिलांसोबत राहात असताना घरामध्ये मिळणारी माया, प्रेम जिव्हाळा सोडून काही तरुण- तरुणी पैसे कमावण्यासाठी आणि 'कॉर्पोरेट' आयुष्य जगण्यासाठी घर सोडून मोठ्या शहरांमध्ये शिफ्ट होतात. अशातच काही दिवस ऑफिसला सुट्टी मिळाली की हे तरुण घराकडे धाव घेतात. बऱ्याच दिवसांनी घरी गेल्यानंतर कुटुंबाकडून अगदी आनंदानं स्वागत केलं जातं. पण ज्या तरुणाला नोकरीवरुन काढून टाकलंय तो घरी परत गेला तर नक्की काय होईल? या प्रश्नाचं उत्तर अगदी साध्या सोप्या आणि निखण पद्धतीनं 'घरवापसी' या वेब सीरिजमध्ये मिळतं.


बंगळुरुमधील एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या शेखर द्विवेदी या यशस्वी तरुणापासून 'घरवापसी' ची कथा सुरु होते. हा शेखर द्विवेदी ऑफिसमध्ये असणाऱ्या व्यवस्थेला कंटाळलेला असतो. पगारात वाढ होईल, अशी अपेक्षा देखील शेखरला असते. पण अचानक शेखरच्या आयुष्यामध्ये मोठं संकट कोसळतं. काही कारणांमुळे कंपनीमधील वरिष्ठ कर्मचारी शेखर आणि त्याच्या टीमला कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतात. नोकरी नसणाऱ्या शेअरला EMI चे हप्ते देखील भरायचे असतात. या महिन्यात पैसे का पाठवले नाही? अशी विचारणा देखील शेखरचे वडील करत असतात. शेखर दुसरी नोकरी शोधण्यास सुरुवात करतो. पण तोपर्यंत तो घरी म्हणजेच इंदूरला राहायला जायचा निर्णय शेखर घेतो. 


दोन भावंड आणि आई-वडील असं शेखरचं कुटुंब असतं. शेखर घरी पोहोचताच त्याचं स्वागत अगदी आनंदानं होतं. नोकरी गेल्याचं शेखर कुटुंबाला सांगत नाही. नोकरीबाबत कुटुंबासोबत बोलण्याचं धडस शेखर करत नाही. घरी आल्यानंतर बालपणीच्या आठवणी, कुटुंबातील लोकांसोबत मस्ती, भावंडांसोबत गप्पा या गोष्टींबरोबरच नव्या नोकरीचा शोध शेखर घेत असतो. शेखरला नोकरी मिळते की नाही? शेखरच्या नोकरीबाबत त्याच्या कुटुंबाला कळतं तेव्हा त्यांची काय रिअॅक्शन असते? हे सर्व अगदी साध्या पद्धतीनं या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. 


डिज्नी प्लस हॉटस्टारवरील या सीरिजचं कथानक अगदी साध आहे. हा या सीरिजचा विक पॉइंट आणि स्ट्रॉन्ग पॉइंट दोन्ही आहे, असं म्हणता येईल. द्विवेदी कुटुंबाची ही साधी, सोपी कथा एकदा तरी बघावी, अशी आहे. विशाल वशिष्ठ, अतुल श्रीवास्तव, विभा छिब्बर, अनुष्का कौशिक, आकांक्षा ठाकुर, साद बिलग्रामी, अजितेश गुप्ता या कलाकांनी वेब सीरिजमध्ये चांगल काम केलं आहे.