Taali Series Review : लहानपणापासून एखाद्या मुलाला मुलीसारखं राहायला आवडतं तर एखाद्या मुलीला मुलासारखं. त्यांच्या आई-वडिलांनाही याची कल्पना वेळोवेळी येत असते. मुलगी मुलासारखे वागू लागली तर आई-वडिलांना तेवढे वावगे वाटत नाही. कारण मोठी झाल्यावर मुलगी मुलीसारखीच वागेल याचा त्यांना विश्वास असतो. मात्र मुलगा मुलीसारखी वागत असेल तर तर मात्र आईवडिलांपुढे मोठे संकट उभे राहते. यातून मार्ग काढणे म्हणजे फार कठिण काम असते.आता जरी याबाबत जागरुकता निर्माण झाली असली, होत असली तरी त्याचे प्रमाण म्हणावे तसे वाढलेले नाही. एका पोलिसाचा मुलगा असलेल्या गणेशला लहानपणापासूनच मुलीसारखे वागावेसे वाटत असते. शाळेतही बाई जेव्हा मुलांना विचारतात मोठेपणी काय व्हायचे आहे, तेव्हा गणेश म्हणतो, मला आई व्हायचंय, गोल गोल चपात्या लाटायच्या आहेत. तेव्हा त्याला सगळे हसतात. एकदा घरात तो लिपस्टिक, टिकली लावून, डोक्यावर ओढणी घेऊन असतो तेव्हा आई त्याला पाहते आणि तिला त्याची जाणीवही होते. गणेश सोसायटीतील कार्यक्रमात लावणीवर नृत्य करीत असतो तेव्हा त्याचे पोलीस असलेले वडिल येतात आणि त्याला नृत्य अर्धवट ठेऊन खेचत घरात नेतात. ते त्याला मारत नाहीत, पण यापुढे मुलीसारखे वागायचे नाही अशी तंबी देतात. पण गणेशच्या मनात स्त्रीने घर केलेले असते त्यामुळे आईच्या मृत्यूनंतर तो घर सोडून पळून जातो. तो गणेशचा गौरी कसा होतो. तृतीयपंथियांना थर्ड जेंडर म्हणून न्यायालयातून मान्यता कशी मिळवून घेतो. या दरम्यान त्याला काय-काय भोगावे, सहन करावे लागते त्याची कथा म्हणजे 'ताली'
'ताली'ची सुरुवातच होते संत तुकाराम महाराजांच्या 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा' या अभंगाने. या संपूर्ण वोबसीरीजचे सार या एका अभंगात आहे. रंजल्या गांजल्यांची सेवा करणाऱ्यालाच देव म्हणावे असा याचा अर्थ आणि श्रीगौरी सावंत ही तृतियपंथीय, ट्रांसजेडरसाठी एखाद्या देवापेक्षा कमी नाही. गौरीच्या भूमिकेसाठी सुष्मिता सेनची निवड करून दिग्दर्शक रवी जाधवने बाजी मारलीय. सुष्मिताची उंची हा एक अत्यंत सशक्त पैलू आहे. सुष्मिता सेन गौरीची भूमिका अक्षरशः जगलेली आहे. पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत सुष्मिता पडद्यावर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवताना दिसते. तृतीयपंथियांसाठी काम करण्यात येणाऱ्या अडचणी, रुग्णालयात तृतीयपंथियाचे पडलेल्या शवाला न्याय देण्यासाठी केलेले अनोखे आंदोलन, भर मंचावर तृतीयपंथियाची बाजू मांडतानाचा आविर्भाव आणि एवढेच नव्हे तर पुरुष असलेल्या देहातील स्त्रीची तडफड सुष्मिताने अत्यंत उत्कृष्टपणे पडद्यावर मांडली आहे. सुष्मिताने या भूमिकेसाठी आवाजही थोडा पुरुषी वाटेल असा काढलाय. श्रीगौरी सावंतच्या भूमिकेला सुष्मिता सेनने 100 टक्के न्याय दिला आहे. केवळ सुष्मितामुळेच ताली बघायला हरकत नाही. आर्या वेबसीरीजनंतर सुष्मिता तालीत एका वेगळ्याच रुपात आलीय.
दिग्दर्शक रवी जाधवने श्रीगौरी सावंतची ही कथा वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणलेली आहे. रवी जाधव एक चांगला दिग्दर्शक आहे आणि त्याने ते वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट देऊन सिद्धही केले आहे. ताली ही त्याची आणखी एक उत्कृष्ट कलाकृती आहे हे त्याच्या दिग्दर्शकीय कौशल्याचे ताजे उदाहरण.अर्थात तालीमध्ये अनेक गोष्टींना स्पर्श करण्यात आलेला नाही. गरीब गौरीकडे लिंगबदलाचे ऑपरेशन करण्यासाठी पैसे कुठून येतात? एखादी एनजीओ तिलाच का मदत करते? असे काही प्रश्न वेबसीरीज पाहाताना मनात येतात. खरी गौरी सावंत ही सावळी असल्याने तिला देहविक्रयात जास्त डिमांड नव्हती त्यामुळे त्यापासून दूर राहिली. हा अत्यंत महत्वाचा उल्लेख वेबसीरीजमध्ये करण्यात आलेला नाही. तसेच सहा एपिसोडऐवजी पाच एपिसोडमध्ये जर ही मालिका एडिट केली असती तर आणखी आकर्षक झाली असती.
तालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील डायलॉग्ज. हे डायलॉग्ज ऐकताना-पाहताना अंगावर येतात आणि विचार करण्यासही बाध्य करतात. ताली बजाऊंगी नहीं बजवाऊंगी, इस देश को यशोदा की बहुत जरूरत है, भारत एक पुल्लिंग शब्द है, लेकिन फिर भी हम उसे मां बुलाते हैं, मुझे स्वाभिमान, सम्मान और स्वतंत्रता तिनों चाहिए हे डायलॉग्ज योग्य वेळी येतात आणि सुष्मिता ज्या पद्धतीने त्याचे उच्चारण करते ते खूप प्रभावी आहे.एकूणच ट्रांसजेंडरसाठी लढणाऱ्या श्रीगौरी सावंतची ही प्रेरक यशो जीवनगाथा अवश्य पाहाण्यासारखी आहे.