Sushmita Sen Taali Web Series Review : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) अभिनित 'ताली'चा (Taali) ट्रेलर आऊट झाल्यापासून या सीरिजबद्दलची उत्सुकता वाढली होती. गौरी सावंत यांच्या आई होण्याच्या प्रवासाची गोष्ट म्हणजे 'ताली' ही सीरिज (Taali Web Series) आहे. तृतीयपंथी असणाऱ्या गौरी सावंत (Gauri Sawant) यांचा संघर्ष, आयुष्यात आलेल्या अडचणींवर त्यांनी केलेली मात अशा अनेक गोष्टी या सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहे. गणेश ते गौरीपर्यंतचा प्रवास पाहताना खरचं अंगावर शहारे येतात.


'ताली'ची कथा काय आहे? (Taali Story)


'ताली' ही सीरिज गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या सीरिजमध्ये करण्यात आला आहे. एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेला गणेश सावंत. वडील पोलीस अधिकारी. पण गणेशचं मुलींसारखं राहणं, नटणं वडिलांना खुपतं आणि तिथुनच खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. खरंतर हा संघर्ष नसून गणेश ते गौरीपर्यंतच्या प्रोसेसला सुरुवात होते.


वयाच्या सतराव्या वर्षी गणेश घर सोडून समाजामध्ये हक्क मिळवण्यासाठी लढायला सुरुवात करतो. राहतं घर सोडून मुंबई गाठतो. पुढे तृतीयपंथ वर्गासाठी लढतो. तृतीयपंथ वर्गालाही स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करुन देतो. त्यांनाही सोयी सुविधा मिळाव्या यासाठी लढतो. पुढे आपल्याला त्यांच्यासाठी लढायचं असेल तर त्यांच्यातलचं एक व्हावं लागेल, याची त्याला जाणीव होते आणि तो व्हेजिनोप्लास्टी सर्जरी करुन गणेशचा गौरी होतो. गौरी सावंत झाल्यानंतरही तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. पण या सगळ्या संकटांचा सामना गौरी सावंत हसतमुखाने करते.


'ताली' या सीरिजचं श्रेय वेब सीरिजशी संबंधित प्रत्येकाचं आहे. सहा भागांची ही सीरिज पाहताना आता पुढे काय होणार? याची उत्सुकता निर्माण होते. दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) आजवर अनेक दर्देदार कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलेत. प्रेक्षकांवर छाप सोडण्यात ही सीरिजदेखील यशस्वी झाली आहे. क्षितिज पटवर्धनचे (Kshitij Patwardhan) कमाल संवाद प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक प्रेम विचारपूर्वक करण्यात आली आहे.


एका स्त्री कलाकाराला पुरुष दाखवणं आणि त्या पुरुषाचा स्त्री होण्यापर्यंतचा प्रवास खूपच चांगल्याप्रकारे दाखवण्यात आला आहे. यासाठी कलाकारांसह मेकअप आर्टिस्ट, कलाकार आणि दिग्दर्शकाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सुष्मिता सेन असो वा बालपणीच्या गौरी सावंतची (Shree Gauri Sawant) भूमिका साकारलेली कृतिका देव (Krutika Deo) असो. दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. तसेच सीरिजमधील नितेश राठोश, अंकुर भाटिया (Ankur Bhatia), नंदू माधव, ऐश्वर्या नारकर (Asishwarya Narkar), हेमांगी कवी (Hemangi Kavi), अनंत महादेवन,  सुव्रत जोशी (Suvrat Joshi) या सर्वच कलाकारांनी आपली भूमिका चोख निभावली आहे.


'ताली' या सीरिजमधील काही दृश्ये खूपच हृदयस्पर्शी आहेत. एकीकडे गणेश गौरी होत असतो त्याचवेळी तिचे वडील अंत्यसंस्कार करत असतात. हा सीन खरचं अंगावर येतो. सिनेमॅट्रोग्राफी चांगली आहे. पण सीरिजमधील काही दृश्ये मात्र फास्ट फॉरवर्ड वाटतात. ही दृश्ये आणखी रंजक बनवता आली असती असं वाटतं. पण गौरी सावंत आणि सुष्मिता सेनसाठी ही सीरिज नक्की पाहा. जिओ सिनेमावर तुम्हाला ही सीरिज मोफत पाहता येईल.


Taali Series Review : सुष्मिता सेनच्या अभिनयाने नटलेली 'ताली'