Sajini Shinde Ka Viral Video Movie Review : 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' (Sajini Shinde Ka Viral Video) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्याचं यूग सोशल मीडियाचं आहे. रोज काही ना काही व्हायरल होत असते. लोक व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड करतात. पण याच गोष्टीमुळे अनेकदा कित्येकांचं आयुष्यात बरबाद होतं. अगदी संबंधित व्यक्तीला आत्महत्या करण्यासही भाग पाडू शकते. आजच्या काळाशी निगडित असलेला हा चित्रपट समाजाला आरसा दाखवणारा आहे. हा सिनेमा ट्विटरवर ट्रेंड होतोय मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडला आहे.


'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ'ची गोष्ट काय आहे? (Sajini Shinde Ka Viral Video Story)


महाराष्ट्रीयन कुटुंबातील सजनी नावाच्या शिक्षिकेची गोष्ट 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या मुलाशी तिचे लग्न होणार असते. सजनी शिक्षिका असली तरी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. शाळेतील सहकाऱ्यांसोबत ती सहलीला जाते. त्याचवेळी तिचा वाढदिवस असल्याने सेलिब्रेशन करण्यासाठी क्लबमध्ये जाते. 


क्लबमधील सजनीचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो. आणि सजनीच्या आयुष्यात वादळ येतं. मुख्याध्यापिका तिला शाळेतून काढतात. होणारा नवराही पाठिंबा देत नाही. वडिलांच्या भीतीमुळे सुसाईड नोट लिहून ती गायब होते. आता सजनीने खरचं आत्महत्या केली आहे की ती गायब झाली आहे. सजनी कुठे आहे आणि हे कोणाचे तरी षडयंत्र आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एक व्हायरल व्हिडिओ तिचं आयुष्य कसं बदलतो ही चित्रपटाची कथा आहे आणि ती अतिशय मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आली आहे.


'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' कसा आहे?


'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' या सिनेमाचं नाव अनेकांनी ऐकलं नसेल. या सिनेमात एकही बडा सेलिब्रिटी नाही. पण कदाचित हीच या चित्रपटाची खासियत आहे. कारण या चित्रपटात तीन नायिका आहेत आणि त्या या चित्रपटाचा प्राण आहेत. हा चित्रपट वेगाने पुढे जात आहे. चित्रपट लवकरच मुद्द्यावर पोहोचतो. पुढे काय होणार याची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते.


स्त्री म्हणजे आधार कार्ड नव्हे कुठेही वापरायला, असा संवाद 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ'  या सिनेमात आहे. महिलांना कोणत्याही प्रकारे वागणूक दिली जाऊ शकत नाही, हे या चित्रपटातून सांगण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आलीा आहे.


राधिका मदनने सजनीची व्यक्तिरेखा साकारली आहे आणि तिने आपली भूमिका चोख बजावली आहे. तिचा अभिनय अप्रतिम आहे. निम्रत कौरने तपास अधिकाऱ्याची भूमिका चोख बजावली. ती चित्रपटात विनोदही आणते पण तिच्या खास शैलीत. भाग्यश्रीने अप्रतिम काम केले आहे. मिखिल मुसळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटावरील त्यांची हुकूमत स्पष्टपणे दिसून येते. कोणाला काय करायचं आहे, कोणाला किती स्क्रीन स्पेस द्यायची आहे, कथा कशी पुढे न्यायची आहे, सगळ्याच बाबतीत मिखिलने चांगलं काम केलं आहे.