Daagdi Chawl 2 Movie Review : मराठी सिनेमा आशयाच्या बाबतीत श्रीमंत आहे, तो कमी पडतो ते सादरीकरणात. अर्थात त्यामागे बजेट हे महत्वाचं कारण असू शकतं मात्र तरीही त्या मर्यादित चौकटीत उत्तम कथेला तेवढ्याच उत्तम पद्धतीनं पडद्यावर कसं मांडलं जाऊ शकतं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे नुकताच रिलीज झालेला 'दगडी चाळ 2' (Daagdi Chawl 2) हा सिनेमा. या सिनेमाचा पूर्ण ‘लूक & फील’ हिंदी आणि दक्षिणेतल्या सिनेमाच्या जवळ जाणारा आहे. अर्थात मी केवळ दिसण्याबद्दल बोलत नाही तर सिनेमा संपल्यावर बाहेर येताना आपल्यासोबत जे उरतं त्या अनुभवाबद्दल बोलतो आहे.
'दगडी चाळ 2' ची गोष्ट फार वेगळी आहे का? तर नाही. असे सिनेमे आपण आधी नक्कीच पाहिले आहेत मात्र ते हिंदी आणि साऊथमध्ये. मराठीमध्ये सर्व बाजुंनी व्यवस्थित जुळून आलेल्या मसालापटाची जी वानवा होती ती ‘दगडी चाळ 2’ या सिनेमाने पूर्ण केली आहे असं नक्कीच म्हणू शकतो. खरं तर सर्व वर्गातल्या, सगळ्या वयोगटातल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे फार कठीण काम मात्र ‘दगडी चाळ 2’ त्या सर्वांना खिळवून ठेवू शकतो इतका उत्तम बनला आहे.
वेगवान आणि नियंत्रित पटकथा ही या सिनेमाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. त्या पटकथेला तेवढ्याच वेगवान पद्धतीनं मांडण्याची जबाबदारी कॅमेरा आणि संकलनाच्या टीमने यशस्वीपणे पेलली आहे.
अंकुश चौधरी, पुजा सावंत या दोघांची कामं उत्तम झाली आहेत. मकरंद देशपांडेंच्या एण्ट्रीला शिट्ट्या वाजतात तिथेच ते जिंकलेत. मला आवर्जून उल्लेख करायचा आहे तो यतीन कार्येकर यांचा. त्यांनी साकारलेला ‘काळा कोट’ भाव खाऊन जातो.
अर्थात या साऱ्यांमध्ये सर्वात जास्त कौतुक करायला हवं ते दिग्दर्शक चंद्रकांत कणसेचं. चंद्रकांतने अनेक मराठी मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. पण त्याचा मोठ्या पडद्याचा सेन्स कमाल आहे. काहीही भव्य-दिव्य नसताना अगदी साध्या साध्या प्रसंगांना उंचीवर कसं घेऊन जायचं आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवतील अशी दृश्यनिर्मिती कशी करायची याचं कसब त्याच्याजवळ आहे. थोडक्यात चंद्रकांतकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे त्याने केवळ दगडी चाळीत अडकून न पडता आणखी वेगळे विषय नक्कीच हाताळायला हवेत.
या सिनेमाबद्दल सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे हा सिक्वेल असला तरी तो सिनेमा म्हणून स्वतंत्र आणि परिपूर्ण आहे. त्यामुळे दगड चाळ न पाहाताही 'दगडी चाळ 2' पाहिलात तर तुम्ही काही मिस करत आहात किंवा काही संदर्भ लागत नाहीत असं होत नाही.
खरं तर या सिनेमात खटकण्यासारख्या फारशा गोष्टी जाणवल्या नाहीत. अर्थात दगडी चाळीत डॅडीचा माग काढत घुसलेली सुर्याची गँग थोडी बालिश वाटते, तो सिक्वेन्सच पटत नाही. काहींना हा सिनेमा काहीसा स्लो वाटू शकतो पण मला ती ताकद वाटते कारण त्या संथपणाचा वापर ताण वाढवण्यासाठी केला गेला आहे.
थोडक्यात दोन तास फुल टाईमपास असं काही पाहायचं असेल तर 'दगडी चाळ 2' हा तुमच्याकडे उत्तम पर्याय आहे. या सिनेमाला मी देतोय साडेतीन स्टार्स.