Ponniyin Selvan 2 Movie Review : बॉलिवूडच्या सिनेमांचं चांगलं कथानक नसल्यामुळे हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडतात. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेमे अनेकदा चांगलं कथानक असूनही सिनेमाची मांडणी योग्यपद्धतीने न केल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडतात. 'पोन्नियिन सेल्वन 1' पाहिल्यानंतर सिनेप्रेमींना अनेक प्रश्न पडले होते. पण या प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या भागात मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला.
'पोन्नियिन सेल्वन 2' हा सिनेमा पाहायला मी सिनेमागृहात गेलो तेव्हा मध्यंतरात काही मंडळींची चर्चा ऐकली. ते म्हणत होते,'पोन्नियिन सेल्वन 2' हा सिनेमा पाहायला उगाच आलो, हा खूपच कंटाळवाणा सिनेमा आहे. 'पोन्नियिन सेल्वन 2' या सिनेमापेक्षा सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा खूपच चांगला आहे. पण 'पोन्नियिन सेल्वन 2' हा सिनेमा आवडणारेदेखील काही मंडळी होते.
'पोन्नियिन सेल्वन 2' या सिनेमाचं कथानक काय आहे? (Ponniyin Selvan 2 Story)
'पोन्नियिन सेल्वन 2' हा सिनेमा प्रसिद्ध लेखक कल्कि कृष्णमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. चोल साम्राज्यातील राजा अरुलमोझी वर्मन या राजाच्या आयुष्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. पहिल्या भागात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या भागात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे सिनेमाचं कथानक पुढे सरकतं.
पोन्नियन सेल्वन आणि वंधियाथेवनचं काय झालं? पोन्नियिन सेल्वन आपल्या भावाला म्हणजेच आदित्य करिकलनला भेटणार का? नंदिनीच्या प्रयत्नांना यश येणार का? उमाई रानी कोण आहे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सिनेप्रेमींना पोन्नियन सेल्वन च्या दुसऱ्या भागात मिळणार आहेत.
'पोन्नियिन सेल्वन 2' या सिनेमातील सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलं आहे. नंदिनीची भूमिका ऐश्वर्या राय बच्चनने चोख बजावली आहे. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. विक्रमनेदेखील चांगलं काम केलं आहे. विक्रम आणि ऐश्वर्याचा सीन खूपच चांगला झाला आहे. ऐश्वर्या आणि विक्रमसह 'पोन्नियिन सेल्वन 2' या सिनेमातील कार्थी, जयम रवी, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाल यासर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
'पोन्नियिन सेल्वन 2' कसा आहे?
'पोन्नियिन सेल्वन 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कल्कि कृष्णमूर्ती यांची कादंबरी वाचणाऱ्यांना 'पोन्नियिन सेल्वन 2' हा सिनेमा समजण्यास सोपं झालं आहे. या सिनेमाचे सीन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. पण कथानकावर आणखी काम व्हायला हवं होतं असं वाटतं. 'पोन्नियिन सेल्वन 2' हा खूपच भव्यदिव्या सिनेमा आहे. या सिनेमातील डायलॉगदेखील कमाल आहेत.
मणिरत्नमने 'पोन्नियिन सेल्वन 2' या सिनेमाच्या दिग्दर्शानाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा भव्यदिव्य करण्याची मणिरत्नमने एकही संधी सोडली नाही. हिंदी भाषिक मंडळींना हा सिनेमा आवडलेला नाही. ए आर रहमानने या सिनेमातील गाणी गायली आहेत.