Khela Hoba Review : निवडणूक कोणतीही असो, जिंकण्यासाठी फोकस असलाच पाहिजे. निवडणूक मोठी असेल तर अर्थात लोकांनाही त्यात मजा येते. 'खेला होबे' (Khela Hobe) हा सिनेमादेखील अशाच एका निवडणुकीवर आधारित आहे. सहा वर्षांपूर्वी बनलेला हा सिनेमा अखेर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिवंगत अभिनेते ओम पुरी (Om Puri) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या निधनानंतर पाच वर्षांनी हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात 'राघवगढ' नावाच्या एका काल्पनिक गावाची गोष्ट मांडण्यात आली आहे. 'राघवगढ' गावातील एक मुलगी गरोदर राहते. त्यानंतर ती मुलगी कोणामुळे गरोदर राहिली याची गावभर चर्चा सुरू होते. 


महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि बच्चूलालची भूमिका साकारणाऱ्या मनोज जोशीला निवडणुका जिंकण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा सापडतो. गावातील मुलीचा गैरवापर कोणी केला, ती मुलगी कोणामुळे गरोद राहिली याचा शोध घेणार हा मुद्दा घेऊन बच्चूलाल निवडणूक लढवण्याचे ठरवतो. तर दुसरीकडे फारीख भाईची भूमिका साकारणारे ओम पुरीदेखील रिंगणात आहेत. पण त्यांना इतरांप्रमाणे खोट्या आश्वासनांच्या जोरावर निवडणूक लढवायची नाही.


राजकारणात लोक फक्त स्वत:च्या फायद्याचा विचार करतात. कोणत्या तरी एका व्यक्तीमुळे गावातील मुलगी गरोदर राहते आणि या नाजूक विषयाचं राजकारण कसं होतं हे या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गरोदर राहिलेली मुलगी ही वेडी आहे हे दिग्दर्शकाला दाखवायचं होतं. पण सिनेमात लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शकाने एवढी लिबर्टी घेतली की अशा कथांमध्ये किती संवेदनशीलतेची आवश्यकता असते हे तो विसरला. 


'खेला होबे' या सिनेमाचं दिग्दर्शन सुनील सी सिन्हाने केलं आहे. हा सिनेमा करण्याआधी त्याने अनेक भोजपुरी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'खेला होबे' या सिनेमाचा विषय थोडा वेगळा आहे. पण तो रुपेरी पडद्यावर मांडण्यात तो कुठेतरी कमी पडला आहे. आला नाही. निवडणुकीच्या वातावरणात ज्या प्रकारचा जल्लोष पाहायला मिळतो तो या सिनेमात दाखवण्यात आलेला नाही. मुंबईतील एसेल स्टुडिओ आणि मढ आयलंडमधील मनीषा बंगल्यात या सिनेमाचं शूटिंग झालं आहे.


'खेला होबे' या सिनेमातील सर्व कलाकारांच्या अभिनयाचा विचार केला तर ओम पुरी, मनोज जोशी यांनी उत्तम काम केलं आहे, पण दिग्दर्शकाला त्या कलाकारांचा योग्य वापर करता आलेला नाही. रती अग्निहोत्रीच्या अभिनयाची झलकदेखील सिनेमात पाहायला मिळाली आहे. मुग्धा गोडसे, रुशद राणा, संजय बत्रा, संजय सोनू, रतन मायाल हे कलाकारदेखील जादू दाखवण्यात कमी पडले आहेत.