एखाद्या हिट चित्रपटातील एखादी व्यक्तिरेखा घेऊन त्यावर चित्रपट तयार करण्याची बॉलिवूडमध्ये पद्धत नाही. हॉलिवूडमध्ये मात्र डिज्नी किंवा मार्व्हल मात्र त्यांच्या चित्रपटातील एखाद्या व्यक्तिरेखेवर चित्रपट तयार करतात. सुजोय घोष द्वारा दिग्दर्शित विद्या बालन अभिनीत कहानी चित्रपट 2012 मध्ये आला होता. या चित्रपटात कॉन्ट्रॅक्ट किलरची भूमिका सास्वत चटर्जी यांनी साकारली होती. ती भूमिका छोटी होती परंतु प्रचंड प्रभावी होती. दिग्दर्शक सुजोय घोषने त्याच बॉब विस्वासची पूर्ण लांबीची कथा लिहिली. आणि शाहरुख खाननं त्याच्या रेड चिली बॅनर अंतर्गत बॉब विस्वासची निर्मिती केली. सुजोयने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्याची मुलगी दिया घोषवर सोपवली.
चित्रपटाची सुरुवात खूप छान पद्धतीने होते. बॉब विस्वास (अभिषेक बच्चन) हॉस्पिटलमधून बाहेर येतो. सात वर्ष तो कोमात असतो. त्याला काहीही आठवत नसते. पत्नी मेरी (चित्रांगदा सिंह) आणि मुलगा त्याला घ्यायला आलेले असतात. त्याच वेळेस दोन पोलीस अधिकारी त्याच्यावर पाळत ठेवताना दिसतात. चित्रपट हळू हलू पुढे सरकतो. बॉब विस्वास त्याचा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा धंदा पुन्हा सुरु करतो. त्यामुळे आता काही तरी घडेल असे वाटत राहते. तसे थोडे फार घडते. नंतर कहानी चित्रपटाप्रमाणे काही तरी वेगळे पाहायला मिळेल असे वाटू लागते. पण चित्रपट जस जसा शेवटाकडे येतो तेव्हा अपेक्षाभंग होतो. कारण चित्रपट नेहमीच्याच साच्यात दिसू लागतो.
ड्रग्जचा कारभार करणारे आणि लहान मुलांना ड्रग्जची सवय लावणाऱ्या गँगची कथा या चित्रपटात मांडण्यात आलेली आहे. बॉब विस्वास या गँगचा आणि भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचा खात्मा करतो. चित्रपट दुसऱ्या भागाची सूचना देतो आणि संपतो.
चित्रपट संपल्यानंतर अभिषेक बच्चनने साकारलेली बॉब विस्वासची भूमिकाच फक्त लक्षात राहाते. अभिषेकने या भूमिकेत जान ओतली आहे. पण कथानकाने त्याला चांगली साथ न दिल्याने त्याची मेहनत वाया गेल्यासारखी वाटते. चित्रांगदाला काही विशेष काम नाही. परम बंडोपाध्याय, पूरब कोहली, अमर उपाध्याय, मिनीची भूमिका करणारी दीपक तिजोरीची मुलगी समारा तिजोरी या कलाकारांनी छोट्या मोट्या भूमिकांमध्ये जान ओतलीय पण ती तेवढ्यापुरतीच. त्याचा ठसा उमटत नाही.
दियाचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न होता. त्यात ती काही प्रमाणातच यशस्वी ठरली आहे असं म्हणावं लागेल. अभिषेकच्या अभिनयासाठी चित्रपट पाहिला जाऊ शकतो पण कथेप्रमाणे काही तरी वेगळे पाहायला मिळेल अशी अपेक्षा ठेऊन चित्रपट पाहाल तर तुमचा अपेक्षाभंग नक्कीच होईल.
कुठे पाहायला मिळेल- झी5 वर