Merry Christmas Review: दिग्दर्शक श्रीराम राघवन, मुख्य नायक विजय सेतुपती (Vijay Sethupathi ), नायिका कतरीना कैफ (Katrina Kaif) हे एक कारण मेरी ख्रिसमस पाहाण्याचे होतेच, नियो नॉयर चित्रपट देण्यात एक्सपर्ट असलेला श्रीराम राघवन मेरी ख्रिसमसचा दिग्दर्शक असल्याने चित्रपटाकडून फार मोठी अपेक्षा होती. त्याचे एक हसीना थी, जॉनी ग़द्दार, बदलापूर आणि अंधाधुन हे चित्रपट अजूनही चांगले आठवतात आणि आजही पाहावेसे वाटतात. त्यामुळे मेरी ख्रिसमसही असाच वेगळा अनुभव देणारा चित्रपट असेल अशी अपेक्षा होती. चित्रपटाचा विषयही अगोदरच ठाऊक असल्याने श्रीराम राघवनने तो पडद्यावर कसा मांडला असेल याची उत्सुकता होती. मात्र चित्रपट पाहून तेवढा आनंद झाला नाही जेवढा राघवनचे अगोदरचे चित्रपट पाहून झाला होता. 


जेव्हा मुंबईला बॉम्बे म्हटले जात असते तेव्हाचा काळ. चित्रपटाचा नायक अल्बर्ट (विजय सेतुपती) सात वर्षानंतर घरी परततो तेथून चित्रपटाची कथा सुरु होते. नाताळच्या रात्रीच तो मुंबईतील आपल्या घरी आलेला असतो. त्याच्या आईचा मृत्यू झालेला असतो. तो दुबईला आर्किटेक्ट म्हणून काम करत असल्याचे सांगत असतो. नाताळची रात्र असल्याने तो फिरायला निघतो. एका रेस्टॉरन्टमध्ये तो जेवायला बसलेला असतो, टॉयलेटला गेला असता एक माणूस त्याला रेस्टॉरन्टमधील एका महिलेला एक निरोप द्यायला सांगतो आणि तो निघून जातो. अल्बर्ट त्या महिलेला निरोप देतो. ती महिला म्हणजे मारिया (कतरीना कैफ) या निरोपानंतर मुलीला घेते आणि रेस्टॉरन्टबाहेर पडते. अल्बर्ट आणि मारियाची चित्ररटगृहातही भेट होते. दोघेही चित्रपट मध्येच सोडून मारियाच्या घरी येतात. वाईनचा एक-एक पेग घेतल्यानंतर मारिया अल्बर्टला म्हणते, फिरून येऊया, दोघे फिरायला जातात, परत येतात तर घरात मारियाचा नवरा मृतावस्थेत दिसतो. अल्बर्ट त्याचे एक सत्य मारियाला सांगतो आणि घरातून निघून जातो. थोड्या वेळाने मारिया मुलीला घेऊन घराबाहेर निघते आणि चर्चमध्ये मासकरिता जाते. तिथे तिला चक्कर येते तेव्हा व्यवसायाने कॅटरर असलेला रॉनी (संजय कपूर) अल्बर्टच्या मदतीने तिला घरी आणतो. मारिया घड्याळ हरवल्याचे कारण सांगत रॉनीबरोबर चर्चमध्ये घड्याळ घेण्यासाठी जाते. रस्त्यात ते अल्बर्टला त्याच्या घरी सोडतात. रॉनी आि मारिया घरी येतात तर तेथे मारियाच्या पतीचा मृतदेह पडलेला असतो. रॉनी पळून जाण्याऐवजी मारियाला मदत करण्यासाठी तेथेच थांबतो आणि पोलिसांना बोलावतो. पोलीस येतात आणि तपास सुरु करतात. सुरुवातीला मारियाच्या पतीने आत्महत्या केल्याचे दिसून येत असते. पण सत्य वेगळेच असते. आणि ते शेवटी उलगडते.


अशा प्रकारच्या कथेवर आजवर अनेक चित्रपट आलेले आहेत. त्यातील काही चित्रपट यशस्वी झाले तर काही संपूर्णपणे फसले. मेरी ख्रिसमस अत्यंत चांगलाही झालेला नाही आणि अत्यंत वाईटही झालेला नाही. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात काहीसा हा चित्रपट यशस्वी झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पटकथेवर म्हणावे तसे काम झालेले नसल्याचे म्हणावे लागेल. मूळ फ्रेंच कथा ला मोंटे चार्जवर आधारित या चित्रपटाची कथा श्रीराम राघवन, पूजा लढा सूरती, अरिजित बिस्वास आणि अनुकृती पांडे यांनी लिहिलेली आहे. श्रीराम राघवनने चित्रपटाची सुरुवात चांगली केली आहे. सुरुवातीला चित्रपट थोडासा रेंगाळतो पण नंतर लवकरच प्रेक्षकांची पकड घेण्यास सज्ज होतो. मात्र ही रंगत शेवटपर्यंत कायम राहात नाही. श्रीराम राघवन आपली जादू मेरी ख्रिसमसमध्ये दाखवण्यात अयशस्वी ठरलाय हे खेदाने नमूद करावेसे वाटते.


चित्रपटाला खरे तर दोनच स्टार देणार होतो पण केवळ विजय सेतुपतीच्या कामासाठी  अडीच स्टार देतोय. विजय सेतुपती प्रत्येक चित्रपटात जान ओततो. जी भूमिका साकारणार असतो, तो त्या भूमिकेत अक्षरशः जान ओततो. आणि हे त्याने सतत सिद्ध केले आहे. मेरी ख्रिसमसही विजय सेतुपतीने त्याच्या खांद्यावर पेलून नेला आहे. अल्बर्टची भूमिका त्याने उत्कृष्टपणे साकारली आहे. संयत भूमिका करण्यात त्याचा हातखंडा आहे. तो अत्यंत साधा आणि भला वाटतो पण रात्री चालताना एका टॅक्सीतून उतरणाऱ्याला धक्का लागल्यानंतर त्याने त्याच्या आतले रूप अत्यंत उत्कृष्टपणे दाखवले आहे, आणि काही क्षणातच तो पुन्हा नॉर्मल होतो. दक्षिण भारतीय चित्रपटात विजय सेतुपतीने अनेक वेगळ्या आणि जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत. विजय सेतुपतीला चांगली भूमिका मिळाली की तो तिचे सोने करतो.


कतरीना कैफने मारियाची भूमिका बऱ्यापैकी साकारली आहे. जाने जानमध्ये ज्याप्रमाणे करीना कपूरने भूमिका साकारली आहे अगदी तशाच प्रकारची कतरीनाची ही भूमिका आहे. बऱ्याच वर्षांनी कतरीनाला नॉन ग्लॅमरस भूमिका मिळालीय आणि तिने ती बऱ्यापैकी साकारलीय. तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक करावे असे नाही.अन्य भूमिकांमध्ये विनय पाठक, संजय कपूर, टिनू आनंद, राधिका आपटे आणि लहान मुलगी परी शर्माने बऱ्यापैकी काम केले आहे.प्रीतमचे संगीत ठीक आहें. डॅनियल जॉर्जचे पार्श्वसंगीत बरे आहे.


विजय सेतुपतीचे फॅन असाल तर चित्रपट पाहून खुश व्हाल, श्रीराम राघवनचे फॅन असाल तर थोडेसे निराश व्हाल. श्रीराम राघवनचा चांगला नियो नॉयर चित्रपट पाहायचा असेल तर जॉनी गद्दार, बदलापूर आणि अंधाधुन पुन्हा पाहा.