Laapata Ladies Review : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) किती परफेक्शनिस्ट आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सिनेमात तो झोकून देत काम करतो. अभिनेत्याप्रमाणेच त्याचं प्रोडक्शन हाऊसदेखील काम करतं. आमिर खान प्रोडक्शन निर्मित 'लापता लेडीज' (Laapata Ladies) या सिनेमाचा त्याचा टच स्पष्ट दिसतो. दिग्दर्शक किरण रावने (Kiran Rao) चांगलच मॅजिक केलं आहे. आमिर खानप्रमाणे किरण रावच्या या सिनेमातही भव्यदिव्य सेट, बडे कलाकार नाहीत. एकंदरीतच आमिरकडून तिने परफेक्ट कसं असायला हवं हे शिकलं आहे. या कलाकृतीच्या माध्यमातून तिने दाखवून दिलं आहे की, ती नक्कीच चांगल्या कलाकृतींची निर्मिती करू शकते. 


'लापता लेडीज'चं कथानक काय? (Laapata Ladies Story)


नुकतेच लग्न झालेले दोन जोडपे एका ट्रेनमध्ये चढतात. दोन्ही नववधूंच्या चेहऱ्यावर मोठे बुरखे आहेत. ते दोघे ट्रेनमधून उतरण्याच्या घाईत कसे बेपत्ता होतात... आणि पुढे काय होते? याची गोष्ट 'लापता लेडीज' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. ट्रेलरवरून कथेबद्दल फारसा अंदाज येत नाही. पण अशा पद्धतीचे सिनेमे सिनेमागृहात जाऊन पाहायला हवे.


'लापता लेडीज' कसा आहे?


कथानक उत्तम असेल तर ती कलाकृती उत्तम होते हे दाखवणारा 'लापता लेडीज' हा सिनेमा आहे. या सिनेमात कोणी खान, कपूर, किंवा कुमार नाही. उत्तम कथानकामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. दोन तासांचा हा सिनेमा आहे. हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना कुठेही कंटाळा येत नाही. एक महत्त्वाचा मुद्दा मनोरंजक पद्धतीने या सिनेमात मांडण्यात आला आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांच्या ज्ञानात भर घालण्याचं काम सिनेमा करतो. या सिनेमातील प्रत्येक पात्र खूप महत्त्वाचं आहे. हॉटेलमध्ये भांडी घासणाऱ्या छोट्या मुलापासून प्रत्येकाची या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना खूप काही सांगून जातो. हलक्या-फुलक्या पद्धतीत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम सिनेमाने केलं आहे.   


'लापता लेडीज' हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना अश्रू अनावर होतात. स्पर्श श्रीवास्तव यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. पण हा सिनेमा पाहताना ते नवोदित आहेत, असं कुठेही जाणवत नाही. एका खेड्यातल्या मुलाच्या भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. रवी किशनने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. रवी किशनच्या दर्जेदार अभिनयाचं कौतुक. दुर्गेश कुमार यांची आपली भूमिका चोख निभावली आहे.


किरन रावचं दिग्दर्शन कसं आहे?


किरन राव या सिनेमाचा हीरो आहे. उत्तमरित्या तिने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिनेमातील अतिशय छोट्या गोष्टींवर तिने काम केलं आहे. 'लापता लेडीज' पाहताना या सिनेमासाठी तिने घेतलेली मेहनत दिसून येते. जवळपास 11 वर्षांनी तिने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. याआधी तिचा 'धोबी घाट' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. किरन रावला चांगली संधी मिळण्याची गरज आहे.


'लापता लेडीज' या सिनेमात तीन नवोदित कलाकार आहेत. नितांशी गोयलने फूल ही भूमिका साकारली आहे. तिचं काम प्रेक्षकांचं मन जिंकून जातं. तिचा वावर पाहून ती नवोदित अभिनेत्री आहे, असं कुठेही वाटत नाही. प्रतिभा रांटाने आपली भूमिका चोख निभावली आहे. तिनेदेखील सटल अभिनय केला आहे. 


राम संपतने 'लापता लेडीज'चं संगीत दिलं आहे. सिनेमातील सर्व गाणी कथानक पुढे घेऊन जाणारी आहेत. गाणी ऐकतानाही प्रेक्षकांना मजा येते. एकंदरीत हा सिनेमा नक्कीच पाहायला हवा. एक साधा सिनेमा तुम्हाला बरचं काही सांगेल.