Kusum Ka Biyaah Review : कंटेट इज किंग... असे म्हटले जाते, अनेकदा हे सिद्धदेखील होते. चांगल्या चित्रपटासाठी मोठे स्टार, महागडे सेट्स, भारदस्त  वेशभूषा आदी गोष्टींची आवश्यकता असते अशातला काही भाग नाही. चांगल्या चित्रपटासाठी एका चांगल्या कथेची, पटकथेची आणि जोडीला अभिनयाची आवश्यकता असते. त्याशिवाय, गोष्ट पडद्यावर सादर करता आली पाहिजे. 'कुसुम का ब्याह' या चित्रपटात हे सगळं जुळून आलं आहे. 


चित्रपटाची कथा काय?


कोरोनाचा आपल्या सर्वांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. या चित्रपटाची कथा कोरोना काळातील आहे. लग्नाचे वऱ्हाड निघते पण त्याच दरम्यान लॉकडाऊन लागू होतो. दोन राज्यांमध्ये अडकलेल्या लग्नाच्या मिरवणुकीचे काय होते? त्यांना त्यांच्याच राज्यात जाण्याची परवानगी कशी नाही? प्रत्येकजण कोणत्या असहायतेतून जातो? हेच या चित्रपटात दाखवण्यात आले आहे आणि ते अतिशय चांगल्या आणि हृदयाला स्पर्शून जाईल अशा पद्धतीने दाखवण्यात आले आहे.


चित्रपट कसा आहे?


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, त्याचा आपल्या सर्वांवर खोलवर परिणाम झाला आहे. मनातील एका कोपऱ्यात या लॉकडाऊनच्या गोष्टी खोलवर रुजल्या आहेत. त्यामुळेच या चित्रपटाच्या कथेशी तुम्ही जोडले जाता. लग्नाच्या वऱ्हाडाला एका राज्याच्या डीएमची परवानगी मिळते, पण त्यांना दुसऱ्या राज्याच्या डीएमचीही परवानगी लागते आणि त्यांना कोरोना होतो. ही परिस्थिती अतिशय भावनिक पद्धतीने दाखवली. चित्रपटात मोठे कलाकार नाहीत पण प्रत्येकजणांची भूमिका तुमच्या हृदयाला स्पर्श करते. चित्रपटातील व्यक्तीरेखेच्या भावना, दु:ख याच्याशी जोडले जाता. या प्रसंगातून तुम्ही स्वत: जात आहात असे वाटू शकते. कलाकारांचा अभिनय अतिशय चांगला आहे. दोन राज्यातील अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवणे, जबाबदारी ढकलणे या गोष्टी प्रशासनातील उणीवा दर्शवतात. 


अभिनय


सुजाना दर्जी, लवकेश गर्ग, राजा सरकार, सुहानी बिस्वास, सगळ्यांचा अभिनय जबरदस्त आहे. प्रत्येकाने स्थानिक बोली भाषा अप्रतिम पकडली आहे. या कलाकारांचा अभिनय आपल्याला कोरोना काळात घेऊन जातो. 


दिग्दर्शन


शुभेंदु राज घोष यांचे दिग्दर्शन चांगले आहे. कथेची मांडणी, सादरीकरण चांगले आहे. प्रेक्षकांच्या मनाची पकड घेण्यास दिग्दर्शक यशस्वी ठरले आहे. एकंदरीत हा एक चांगला चित्रपट आहे जो बघता येईल.