Joram Review : बॉलिवूडचा अभ्यासू अभिनेता अर्थात मनोज वाजपेयीचा (Manoj Bajpayee) 'जोरम' (Joram) हा सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'जोरम'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमातील मनोजच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. हा सिनेमा अंगावर शहारे आणणारा आहे. मनोज हा अभिनेता नसून अभिनयातील गुरू आहे. 'जोरम' हा सिनेमा मनोजने पेलला आहे.


'जोरम' या सिनेमाचं कथानक काय? (Joram Movie Story)


'जोरम' या सिनेमात एका आदिवासी व्यक्तीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. पती-पत्नी दोघेही मजूर म्हणून काम करतात आणि आयुष्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. पण नंतर त्यांच्यावर हल्ला होतो. सिनेमातील नायकाच्या पत्नीचा मृत्यू होतो नंतर तो आपल्या बाळाला घेऊन पळून जातो. एकीकडे गोळ्या झाडणारा आदिवासी व्यक्ती आता मात्र गोळ्यांपासून पळत आहे. ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. त्यामुळे हा सिनेमा पाहायला सिनेमागृहात नक्की जा. 


'जोरम' कसा आहे? 


'जोरम' हा कमाल सिनेमा आहे. अनेक गोष्टी सांगणारा हा सिनेमा आहे. मानवाने केलेल्या पर्यावरणाच्या नुकसानाबद्दल भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात नक्षलवादावरही भाष्य करण्यात आलं आहे. झारखंडच्या राजकारणाची मुद्दा आहे. स्थानिक परिस्थितीचा उलगडाही या सिनेमात करण्यात आला आहे. हा सिनेमा तुम्हाला धक्का देतो. लेकाचा बचाव करण्यासाठीचा संघर्ष 'दसरू'मध्ये दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा तुम्हाला धक्का देतो. या सिनेमातील प्रत्येक फ्रेम काहीतरी सांगू पाहणारी आहे. ना कोणते बडे सेट किंवा महागडे कॉस्ट्यूम पण तरीही हा सिनेमा तुमच्या मनावर राज्य करेल. अनेक फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचं कौतुक होत असलं तरी सिनेमागृहात या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने सिनेमा यशस्वी होईल. 


मनोजच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमीच...


मनोज वाजपेयीला अभिनय करताना पाहून तुम्हाला अनेक प्रश्न पडतील. आपल्या भूमिकेला त्याने 100% दिले आहेत. मनोज वाजपेयीचा दर्जेदार अभिनय पाहण्याजोगा आहे. मनोजच्या पत्नीची भूमिका तनिष्टा चटर्जीने साकारली आहे. या सिनेमाचं संगीतदेखील उत्तम झालं आहे. स्मिता तांबेने आपली भूमिका चोख निभावली आहे. खलनायकांनीदेखील चांगलं काम केलं आहे.


देवाशीष मखीजा यांनी 'जोरम' या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या यशात मनोज वाजपेयीचा जितका वाटा आहे तेवढाच देवाशीष मखीजाचादेखील आहे. या सिनेमातील त्याची पकड जबरदस्त आहे. देवाशीषने या सिनेमाचं कथानक लिहिण्यासाठी मोठा रिसर्च केला आहे. एकंदरीतच हा सिनेमा नक्की पाहावा असा आहे. जास्त प्रमोशन न करता रिलीज झालेल्या सिनेमांमध्ये याचा समावेश आहे. पण तरीही हा सिनेमा चर्चेत आहे.