Ghoomer Movie Review : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांची मुख्य भूमिका असलेला 'घूमर' (Ghoomer) हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिषेकचा सिनेमा अनेक वर्षांनी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाल्याने या सिनेमाबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक होते. तर प्रेक्षकांवर छाप पाडण्यात अभिषेक यशस्वी झाला आहे. आयुष्यातले दरवाजे उघडत नसतील तर ते तोडणं गरजेचं आहे, असे संवाद अभिषेक म्हणतो आणि प्रेक्षक विचार करायला भाग पाडतात.
'घूमर'चं कथानक काय आहे? (Ghoomer Movie Story)
स्वप्न साकार करण्यासाठी कोणत्याही थराला जाता येतं हे सांगणारा 'घूमर' हा सिनेमा आहे. महिला क्रिकेटर अनिनी यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. अनिनीला भारतीय क्रिकेट संघात खेळायची इच्छा असते. तिची निवडदेखील होते. पण काही कारणाने तिला खेळता येत नाही. बॅटिंग करता येत नाही. त्यामुळे आता ती क्रिकेट कशी खेळणार असा प्रश्न उपस्थित होतो. त्यावेळी क्रिकेटची आवड असणारे आणि खेळणारे पदम सिंह सोढी यांची तिच्या आयुष्यात एन्ट्री होते. दरम्यान ते तिची ओळख बॉलिंगसोबत करुन देतात. क्रिकेट म्हणजे फक्त बॅटिंगचं नाही हे तिला पटवून देतात. त्यानंतर खऱ्या अर्थाने तिच्या ट्रेनिंगला सुरुवात होते. आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहायला लागेल.
'घुमर' कसा आहे?
'घूमर' या सिनेमाचा अभिषेक बच्चन जान आहे. सिनेमातील त्याची प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी आहे. या सिनेमात अभिषेकने क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. सिनेमा पाहताना अभिषेकने या सिनेमासाठी घेतलेली मेहनत दिसून येते. अभिषेकची तुलना त्याचे वडील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत करता कामा नये. अभिषेकदेखील सिनेसृष्टीतील एक दर्देदार अभिनेता आहे. अर्थात 'घूमर' पाहताना याचा अंदाज येतोच.
सैयामी खेरच्या कामाचंही कौतुक. तिने आपली भूमिका चोख निभावली आहे. आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्यात तिने खूप मेहनत घेतली आहे. अभिषेक आणि सैयमीच्या आयुष्यातील हा एक चांगला सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट आहे. सिनेमात शबाना आजमीने सैयामीच्या आजीची भूमिका साकारली आहे. आपली नात एक चांगली क्रिकेटर व्हावी यासाठी आजी खूप मेहनत घेताना दिसत आहे. त्यामुळे शबाना आजमी यांनीदेखील गोड काम केलं आहे. अंगद बेदीने या सिनेमात सैयामीच्या खास मित्राची भूमिका साकारली आहे. छोटी भूमिका असली तरीदेखील त्याने चांगलं काम केलं आहे.
आर बाल्की (R. Balki) यांनी 'घूमर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे.या सिनेमाचं दिग्दर्शन उत्तम झालं आहे. सिनेमातील प्रत्येक पात्र दिग्दर्शकाने योग्य पद्धतीने दाखवलं आहे. आर.बाल्की हे हिंदी सिनेसृष्टीतील एक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मिथुनने या सिनेमाला संगीत दिलं आहे. ही गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
'घूमर' हा कौटुंबिक सिनेमा आहे. तुम्ही आयुष्याला कंटाळला असला, आवडीचं काम किंवा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असेल तर 'घूमर' हा सिनेमा नक्कीच प्रेरणादायी ठरेल. 'घूमर' हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच नक्की पाहा...