Vettaiyan Movie Review : रजनीकांतचे फक्त नाव उच्चारताच त्याच्या सर्व करामती डोळ्यासमोर येतात. काही कलाकार असे असतात की त्यांनी काहीही केले तरी ते प्रेक्षकांना आवडतेच. खरा मास महाराजा अशा कलाकारालाच म्हणतात आणि रजनीकांत हा असा खरा मास महाराजा सुपरस्टार आहे असे म्हटले तर चूक ठरणार नाही. या वयातही त्याचा औरा, रुबाब काही औरच असतो आणि रजनीकांत पडद्यावर आल्यानंतर आपण फक्त त्याला बघत बसतो. अशी जादू दुसऱ्या कुठल्याही कलाकाराला आजवर जमलेली नाही हे सत्य आहे.
रजनीकांतचा नवा चित्रपट वेट्टैयन हा असाच रजनीकांतच्या नेहमीच्या इमेजला साजेसा चित्रपट आहे. वेट्टैयन म्हणजे शिकारी. रजनीकांतने या चित्रपटात एन्काउंटर स्पेशालिस्ट अथियनची भूमिका साकारली आहे. समाजात शांती निर्माण व्हावी असे वाटत असेल तर अशा गुन्हेगारांना यमसदनी पाठवणे योग्य असे त्याचे मत असते. मात्र एन्काउंटर झाल्यानंतर मानवाधिकारी आयोग आणि अन्य तथाकथित समाजसुधारक न्यायालयात धाव घेतात. त्यांनाही अथियन पुरून उरत असतो. अथियन असाच एका बलात्काऱ्याचा एन्काऊंटक करतो. त्याने शरन्या (दुशारा विजयन) नावाच्या शिक्षिकेवर बलात्कार करून तिची निघृण हत्या केलेली असते. हे प्रकरण मानवाधिकार आयोगाचे न्यायमूर्ती सत्यदेव (अमिताभ बच्चन) यांच्याकडे जाते. सत्यदेव या प्रकरणातील सत्य बाहेर काढून अथियनला त्याची चूक दाखवून देतात. खऱ्या मारेकऱ्याला पकडण्यासाठी अथियन सत्यदेव यांच्याकडे वेळ मागून घेतो आणि खऱ्या मारेकऱ्याचा आणि त्यामागील कटकारस्थान उघडकीस आणतो. मात्र या प्रवासात अथियनमध्येही आमूलाग्र बदल होतो. तो बदल काय होतो ते चित्रपट पाहिल्यावरच समजेल.
रजनीकांतने त्याच्या नेहमीच्या स्टाईलने एन्काउंटर स्पेशालिस्ट अथियनची भूमिका साकारली आहे. त्याची स्टाईलबाज ॲक्शन आणि डोळ्यावर चश्मा लावण्याची पद्धत आकर्षक आहे. सबकुछ रजनीकांत असा हा चित्रपट असल्याने तो संपूर्ण चित्रपट व्यापून टाकतो.
अमिताभ बच्चन यांनी न्यायाधीश सत्यदेव यांची भूमिका त्यांच्या वयानुरूप साकारली आहे. अमिताभ आणि रजनीकांतमध्ये द्वंद्व दिसेल असे वाटत होते पण तसे चित्रपटात काहीही नाही. अमिताभच्या जागी दुसरा कोणताही कलाकार असता तरी चालले असते, पण केवळ हिंदी बेल्टमध्ये अमिताभचे नाव आहे म्हणून त्यांना घेतले असावे.
रजनीकांतनंतर कमाल केलीय ती फहाद फसील या अभिनेत्याने. पॅट्रिक नावाच्या आयटी एक्सपर्ट अनाथ तरुणाची भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे. काही प्रसंगात त्याने विनोद निर्मितीही केली आहे. त्याची भूमिका विशेषत्वाने लिहिली आहे असे वाटते.
राणा दगुबत्तीने चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. तो शेवटी शेवटीच चित्रपटात दिसतो, त्याने त्याच्या भूमिकेला बऱ्यापैकी न्याय दिला आहे. मंजू वॉरियरने रजनीकांतच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
दिग्दर्शक टी. जी. ज्ञानवेल याने रजनीकांतचा औरा लक्षात घेऊन चित्रपटाची कथा तयार करून तशाच पद्धतीने चित्रपटाची आखणी केली आहे. सुरुवातीचा अर्धा तास खास रजनीकांत फॅन्ससाठीच आहे. त्यानंतर चित्रपट एका वेगळ्या वळणावर जातो आणि रहस्याचा उलगडा केला जातो. रजनीकांतसोबतच ज्ञानवेलने देशातील शिक्षण व्यवस्थेवर चांगले भाष्य केले आहे. गरीबांना शिक्षण मिळावे असे सरकारला वाटते पण शिक्षण माफिया त्याचा कसा गैरफायदा घेतात. गरीब शिक्षणापासून कसे वंचित राहातात हे त्याने बऱ्यापैकी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जय भीमसारखा चांगला चित्रपट देणाऱ्या ज्ञानवेलने या चित्रपटातही सामाजिक समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे जो बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. एकूणच सांगायचे झाले तर रजनीकांत फॅन असाल तर हा चित्रपट बघा आणि नसाल तर अवश्य बघा. तुमचे पैसे वाया जाणार नाहीत आणि अडीच तास फुल मनोरंजन होईल याची खात्री हा चित्रपट देतो.
- चित्रपट - वेट्टैयन
- निर्माता - लायका प्रॉडक्शन
- लेखक - दिग्दर्शक- टी. जे. ज्ञानवेल
- संगीत - अनिरुद्ध रविचंदर
- कलाकार - रजनीकांत, अमिताभ बच्चन, फहाद फसील, राणा दगुबत्ती, मंजू वॉरियर, दुशरा विजयन
- रेटिंग - 3 स्टार