Code Name Tiranga Review: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि गायक हार्डी संधू (Harrdy Sandhu) यांचा चित्रपट ‘कोडनेम तिरंगा’ (Code Name Tiranga) आज (14 ऑक्टोबर) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा पहिल्यांदाच जबरदस्त अॅक्शन करताना दिसली आहे. परिणीती चोप्रा आणि हार्डी संधू यांच्यासोबत शरद केळकर, रजित कपूर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती आणि दिशा मारीवाला यांसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.


चित्रपटाच्या नावावरून अर्थात ‘कोडनेम तिरंगा’ यावरूनच कळतं की, हा चित्रपट देशासाठी गुप्त मिशनवर जाणाऱ्या एखाद्या रॉ एजंटची कथा सांगणारा असणार आहे. मात्र, कथेत ट्वीस्ट असा आहे की, यावेळी गुप्तहेर एखादा पुरुष नाही तर, स्त्री असणार आहे. हेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे. चित्रपट पाहताना सतत कथा जुनीच असल्याचं लक्षात येतं. कलाकारांचा अभिनय चांगला असला तरी कथेत काही नाविन्य नाही. चित्रपटाची कथा ही रटाळवाणी वाटते. जाणून घेऊया कथानक..


मिशनवर निघालीये अभिनेत्री!


‘कोडनेम तिरंगा’ ही कथा आहे दुर्गा नावाच्या रॉएजंटची, जी परदेशात एका मोहिमेवर आहे. या रॉ एजंटचं पात्र परिणीती चोप्राने साकारले आहे. तिच्याकडे एका कुख्यात दहशतवाद्याला पकडण्याचे मिशन आहे आणि या मिशनदरम्यान तिची भेट हार्डी संधूशी होते. आता चित्रपटाचे हिरो आणि हिरोईन भेटले की, नेहमीप्रमाणे पुढे काय होतं, तेच या चित्रपटात देखील दाखवण्यात आले आहे. तशा या चित्रपटात बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळतील. चित्रपटातील मिशन तर पूर्ण झाले आहे. पण, या दरम्यान चित्रपट पाहणारा प्रेक्षकही मिशनवर निघतो. हे मिशन म्हणजे चित्रपटाची कथा शोधण्याचं मिशन. हा चित्रपट पाहताना सतत वाटत राहतं की, आपण असेच चित्रपट आधीही पाहिले आहेत. चित्रपटाची कथा ही चित्रपटासाठी मारक ठरली आहे.


कसा वाटला कलाकारांचा अभिनय?


अभिनेत्री परिणीती चोप्राने या चित्रपटात उत्तम काम केले आहे. ती अॅक्शन अवतारात चांगलीच फिट झाली आहे. परिणीती जेव्हा अॅक्शन करते, तेव्हा तो सीन पाहण्यात गुंतून जायला होतं. केवळ अॅक्शनच नाही तर, परिणीतीने इमोशनल सीन्सही उत्तम केले आहेत. या चित्रपटासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे, हे चित्रपट पाहिल्यावरही लक्षात येतं. हार्डी संधूने देखील त्याचं पात्र छान निभावलंय. या पात्रात तो कुठेही नवखा अभिनेता वाटत नाही. त्याच्या संवाद शैलीत किंवा अभिनयात कुठेही तो गायक असल्याची झलक दिसत नाही. एखाद्या प्रशिक्षित अभिनेत्याप्रमाणे त्याने काम केले आहे. अभिनेता शरद केळकर याने या चित्रपटात खलनायक साकारला आहे. त्याची पडद्यावरची उपस्थिती देखील अप्रतिम वाटते. रजित कपूरने यांनीही त्यांची भूमिका चांगल्याप्रकारे निभावली आहे. दिव्येंदू भट्टाचार्य यांनेही उत्तम अभिनय केला आहे. एकंदरीत सगळ्याच कलाकारांचा अभिनय चांगला आहे. पण, कथा कमजोर पडल्याने चित्रपट गडबडल्यासारखा वाटतो.


कथा पडली कमजोर!


चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. लोकेशन देखील उत्तम आहे. संगीतही चित्रपटाला साजेसे आहे. मात्र, या सगळ्याला मारक ठरणारी एकाच गोष्ट आहे ती म्हणजे कथा. चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाला कथेत काही ट्विस्ट आणि टर्न अपेक्षित होते. पण, ते दिसलेले नाहीत. अशावेळी प्रेक्षक चित्रपट संपण्याची वाट पाहतो. दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांनी असा चित्रपट बनवण्याआधी कथेवर अधिक मेहनत घ्यायला हवी होती. चित्रपटाचे कास्टिंग चांगले आहे, कलाकारांचा अभिनय चांगला झालाय. पण, कथेमुळे चित्रपट आपला प्रभाव दाखवू शकलेला नाही.


हेही वाचा :


Code Name Tiranga: परिणीती चोप्रा-हार्डी संधूचा ‘कोडनेम तिरंगा’ प्रेक्षकांच्या भेटीला! अवघ्या 100 रुपयांत पाहता येणार चित्रपट