मुंबई : गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा पुरस्कार करण्यात येणार आहे. समाजापासून लांब असणाऱ्या भटक्या-विमुक्त समाजासाठी त्यांनी वर्षानुवर्षे उल्लेखनीय कार्य केलंय. याच कार्याची पोचपावती म्हणून पद्म पुरस्काराने त्यांना आता सन्मानित करण्यात येतंय. पारधी समाजासाठी, समाजातील मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 'गुरुकुलम' ही संस्था करत असलेल्या कामात त्यांचा मोठा वाटा आहे. केवळ सामाजिक कार्यकर्तेच नाही तर लेखक, कवी आणि एक उत्तम चित्रकार अशीदेखील पद्मश्री गिरीश प्रभुणेंची वेगळी ओळख आहे.


पारधी समाजाच्या अडचणी, त्यांचे प्रश्न सीमित न राहता ते सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी आपल्या लेखणीतून या गोष्टी इतर समाजासमोर मांडल्या. प्रसिद्धीचा हव्यास न करता, अगदी साधेपणाने, शांतपणे, संकटांमध्ये सुद्धा आपलं कार्य सुरूच ठेवलं.


सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी आयुष्यभर समर्पित वृत्तीने सामाजिक कार्य केले. पारधी समाजातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि सामाजिक समरसतेसाठी त्यांनी केलेले कार्य विलक्षण आहे. गिरीश प्रभुणे यांना देखील पद्मश्रीची घोषणा झाली आहे. लिज्जत पापड उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार देणाऱ्या जसवंतीबेन पोपट यांना देखील पद्मश्रीची घोषणा करण्यात आली आहे.




पद्मश्रीची घोषणा झाल्यावरच्या भावना...


पद्मश्रीच्या घोषणेबद्दल सांगताना मला विश्वास नाही बसला असं प्रभुणेंनी सांगितलं. दिल्लीहून गृहखात्याच्या सेक्रेटरींचा फोन आला, त्यांनी या पुरस्काराबद्दल माहिती दिली. तुम्ही हा सन्मान स्वीकारणार आहात का, असा सवाल केला, संमती असल्यास स्वीकृती कळवावी, असं त्यांनी म्हटलं. पद्मश्री मिळण्याइतकं मी काम केलंय असं मला वाटत नाही, कारण कामाबाबत मी अजून समधानी नाहीए कारण ही स्थिती अजून बदललेली नाही, असं प्रभुणे यांनी सांगितलं.


समाजासाठी काम करण्याची प्रेरणा कुठून व कशी मिळाली?


या क्षेत्राकडे वळण्याबाबत गिरीश प्रभुणेंनी एक कथा सांगितली, त्यांच्या आयुष्यातील त्यांची पहिली कादंबरी! "वाचनामुळे माझ्यावर संस्कार झाले पण याच वाचनाच्या नादात मी आठवीत नापास झालो, घरचे चिंतेत होते. त्यावेळी मी शरदचंद्रांची एक कादंबरी वाचली, कादंबरीतील उल्लेखानुसार मी सुद्धा त्यांच्यासारखं फिरावं असं वाटू लागलं. त्याचवेळी शाळेतल्या मित्राचा चेहरा समोर आला. अधूनमधून शाळेत येत नसलेल्या माझ्या मित्राचा पहिला क्रमांक यायचा आणि नियमितपणे शाळेत जाऊनही माझा दुसरा क्रमांक येत. तेव्हा त्याच्यासोबत हिंडायला, गावागावात फिरायला सुरुवात केली. तेव्हा बऱ्याच गोष्टी उलगडल्या. या सर्व नव्याने उलगडलेल्या गोष्टी पाहून मी माझी पहिली कादंबरी लिहिली. परीक्षेला न बसता कादंबरी लिहीत बसलो, त्यामुळेच नापास झालो. मात्र तुमचा मुलगा वाया गेलाय म्हणत तक्रार करणाऱ्याच शिक्षकांनी ती कादंबरी वाचून घरी येऊन माझं कौतुक केलं. तेव्हा सुरुवात झाली समाजातील घटकांबद्दल लेखनाची!


हळूहळू विविध गावांमध्ये दौरे केले. या निरागस पारध्यांना कसं अडकवलं जायचं हे नेमकं तेव्हा दिसलं. पोलिसांनी केलेल्या चुका लपवण्यासाठी निर्दोष पारध्यांना जबाबदार धरलं जात, पारधी चोऱ्या करतात, दरोडा घालतात असं मांडलं जायचं, निरपराध पारध्यांना गोळ्या घालून मारलं सुद्धा जायचं. या पोलिसांविरोधात मी केलेल्या तक्रारीनंतर बारा पोलीस पहिल्या त्यावेळी सस्पेंड झाले, तेव्हा आत्मविश्वास निर्माण झाला आणि पारधी या विषयात खेचलो गेलो. गावोगावी पारध्यांवर होणारे अन्याय तेव्हापासून आणखी स्पष्टपणे दिसू लागले.


एकदा पोलिसांनी केलेल्या बलात्काराची घटना समोर आली, एक शिकलेला धडधाकट पीएसआय बलात्कार करू शकतो यावर विश्वासच बसत नव्हता, पोलिसांकडून बलात्कार झालेल्या महिलेला खाणीत उडी टाकताना पाहिलं, तेव्हा ठरवलं पोलिसांच्या कोणत्याही गोष्टींवर सहज विश्वास ठेवायचा नाही. मग मी पोलिसांना सहकार्य न करता, माझं कार्य बघून पोलिसांनीच मला सहकार्य करणार असल्याचं आश्वासन दिलं!
अन्यायासाठी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला, आम्ही घेराव घालून बसायचो, रोजगार मिळावे, उद्योग मिळावेत या मागण्या करायचो. या समाजाचा सखोल अभ्यास केला आणि यांच्या विकासासाठी शिक्षण हाच एक मुख्य उपाय दिसला. कौशल्यावर आधारित विविध शाखा असलेली शाळा सुरू करण्याची प्रभुणेंची इच्छा होती, वनौषधीची लागवड, कास्टिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशन बांबूपासून घर कसं बांधावं, झोपडी कशी बांधावी, अशा सर्व घटकांचा इथं अभ्यास होत. निसर्गात वाढलेल्या निसर्गाशी नातं असलेल्यांसाठी माणूस म्हणून घडवायचंसुद्धा त्यांनी त्याच पद्धतीनं करायचं ठरवलं.

संस्थेला जप्तीची नोटीस, थकीत 1 कोटी 86 लाखांचा कर भरण्याचे आदेश


ज्येष्ठ समाजसेवक आणि पारधी समाजासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या गिरीश प्रभुणे यांना पिंपरी चिंचवड मनपाने मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी उभ्या केलेल्या गुरुकुलम या संस्थेचा एक कोटी 86 लाखांचा कर थकल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. एका हातात सन्मान आणि दुसऱ्या हातात जप्तीची नोटीस अशा काहीशा अवस्थेला गिरीश प्रभुणे यांना सामोरं जावं लागतंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती आता भाजपची सत्ता आहे.


नुकतंच 25 जानेवारीला ज्येष्ठ समाजसेवक आणि पारधी समाजासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या गिरीश प्रभुणे यांना केंद्रानं पद्मश्री जाहीर केला. तर दुसऱ्याच दिवशी निस्वार्थ भावनेनं पारधी समाजासाठी उभ्या केलेल्या गुरुकुलम आणि परिसराचा 1 कोटी 86 लाखाचा कर थकल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेनं त्यांना जप्तीची नोटीस बजावली आहे.


पद्मश्री दिल्यानंतर त्यांच्याच संस्थेला जप्तीची नोटीस येणं दुर्दैवी आहे. या नोटीशीवरून सध्या राजकारण सुरू आहे. गिरीश प्रभुणेंना पद्मश्री मिळाल्यानंतर समाजातील दुर्बल, दुर्लक्षित घटकांकडे सरकारचं लक्ष जाईल, देशभरातून मदतीसाठी हात येतील आणि हा पुरस्कार नक्कीच परिवर्तन करणारा ठरेल.