मुंबई : तुम्ही अनेकदा डिप्रेशनमध्ये असता तेव्हा तुमचं सोशल मीडिया स्टेटस बदलता. सोशल मीडियावर तुमच्या मूडप्रमाणे व्यक्त होता. मात्र आता तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का, हे तुमचे सोशल मीडियावरील फोटोच सांगणार आहेत.
तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात की नाही, हे इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंवरुन ओळखलं जाऊ शकतं, असा अहवाल नुकताच समोर आला आहे.
संशोधनाचा अहवाल काय सांगतो?
ईपीजे डेटा सायंस या अहवालानुसार, इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो तुमची मानसिक परिस्थिती सांगतात. सर्वसाधारणपणे तुमचे फोटोतील हावभाव, स्टाईल आणि पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट केली जाते. मात्र फोटो यापेक्षाही अधिक काही सांगू शकतात.
इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करण्यापूर्वी त्यामध्ये जे काही बदल केले जातात, जसं की कलर फिल्टर वगैरे, यामधून युझर्सची मानसिक परिस्थिती समजते. डिप्रेशनमध्ये असलेले युझर्स सामान्य युझर्सच्या तुलनेत जगाला वेगळ्या नजरेतून पाहतात, असंही संशोधनात म्हटलं आहे.
संशोधक काय म्हणतात?
जे लोक डिप्रेशनमध्ये असतात ते त्यांचे फोटो ब्ल्यू, ग्रे आणि डार्क टोन्समध्ये अपलोड करत असल्याचं संशोधनात आढळून आलं, असं हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधक अँड्र्यू रेसी आणि त्यांचे सहकारी ख्रिस्तोफर डॅनफोर्थ यांचं म्हणणं आहे.
संशोधन कसं करण्यात आलं?
रेसी आणि डॅनफोर्थ यांनी या संशोधनात सहभागी करुन घेतलेल्या युझर्सना 'डिप्रेस्ड' आणि 'हेल्दी' असे टॅग त्यांच्या मेडिकल रिपोर्टच्या आधारावर दिले. त्यानंतर इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या फोटोंमध्ये पॅटर्न्स शोधण्यासाठी लर्निंग टूल्सचा वापर करण्यात आला.
संशोधनाचा निकाल काय सांगतो?
संशोधनात सहभागी असलेल्या डिप्रेशनमधील युझर्सने फिल्टर्सचा वापर कमी केला होता. या युझर्सने केवळ इंकव्हेल या फिल्टरचा वापर केला. या फिल्टरमध्ये फोटो ब्लॅक अँड व्हाईट होतात. तर हेल्दी युझर्सने व्हेलेंसिया या फिल्टरचा जास्त वापर केला, जे फोटोंचा कलर कमी करतात.
डिप्रेशनमध्ये असलेले युझर्स केवळ चेहऱ्याचा फोटो पोस्ट करतात. तर हेल्दी युझर्स वेगवेगळ्या पोझमधील फोटो पोस्ट करणं पसंत करतात.
दरम्यान हे संशोधन सर्वच इंस्टाग्राम युझर्ससाठी लागू होत नाही, असंही संशोधनकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नोट : हे वृत्त संशोधनाच्या आधारावर करण्यात आलं आहे. एबीपी माझा या संशोधनाची पुष्टी करत नाही. तुम्हाला संशोधनातील कोणत्याही सल्ल्याला अनुसरुन उपचार घ्यायचा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? इंस्टाग्राम उत्तर देणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2017 12:10 PM (IST)
इंस्टाग्रामवर अपलोड केलेले फोटो युझर्सचे हावभाव व्यक्त करतात. त्यातून कोण डिप्रेशनमध्ये आहे आणि कोण हेल्दी आहे, हे ओळखता येऊ शकतं, असं एका संशोधनात आढळून आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -