World Youth Skills Day 2024 : आजकाल माणसाचे राहणीमान, खाणे, पिणे आणि पेहरावात झपाट्याने बदल होत चाललेत. यासोबत माणसाच्या कामाच्या पद्धतीतही अनेक बदल झाले आहेत. आजच्या युगात आता अनुभवापेक्षा कौशल्याला महत्त्व दिले जात आहे. आज केवळ भारतच नाही तर जगभरात असे अनेक देश आहेत, जिथे अनेक तरुण बेरोजगार फिरत आहेत. त्यासाठी केवळ शिक्षणालाच जबाबदार धरून चालणार नाही तर कौशल्याचा अभावही विचारात घेण्याची गरज आहे. यावर दृष्टीक्षेप टाकण्यासाठी दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. काय आहे या दिनाचा उद्देश? काय सांगतो या दिवसाचा इतिहास? जाणून घ्या सर्वकाही



जागतिक युवा कौशल्य दिनाचा उद्देश काय आहे?


दरवर्षी 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. देशाच्या जडणघडणीत तरुणांचे योगदान सर्वात मोठे आहे. हा दिवस साजरा करण्यामागे युवकांना कौशल्य विकासाची जाणीव करून देणे, तसेच त्यांना काम किंवा व्यवसायासाठी आवश्यक कौशल्यं उपलब्ध करून देणे हा आहे. याद्वारे ते केवळ स्वतःचच नाही तर देशाचंही भलं करू शकतात. बेरोजगारी वाढण्यास कौशल्याचा अभाव देखील काही प्रमाणात कारणीभूत आहे. या दिवसाच्या उत्सवाची सुरुवात कशी झाली आणि हा दिवस कोणत्या थीमवर साजरा केला जात आहे हे जाणून घेऊया.



जागतिक युवा कौशल्य दिनाचा इतिहास


2014 मध्ये, श्रीलंकेने युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीसमोर तरुणांना रोजगारासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याचा प्रस्ताव दिला. ज्याला 18 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने मान्यता दिली आणि 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 15 जुलै रोजी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो.



हा दिवस का साजरा केला जातो?


झपाट्याने बदलणाऱ्या या जगात माणसांचे राहणीमान, खाणे, पिणे आणि पेहराव तर बदलला आहेच पण काम करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल झाले आहेत. पूर्वी नोकरीत अनुभव आवश्यक होता, आता अनुभवापेक्षा कौशल्ये महत्त्वाची आहेत. अभ्यासासोबतच नोकरीसाठी काही महत्त्वाच्या कौशल्यांच्या मदतीने तुम्ही व्यावसायिक जीवनात लवकरच यश मिळवू शकता. हा संदेश तरुणांपर्यंत पोहोचवणे हा हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.


 


जागतिक युवा कौशल्य दिन 2024 ची थीम


जागतिक युवा कौशल्य दिन 2024 ची थीम “शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्य” आहे.
2023 हे वर्ष ‘परिवर्तनात्मक भविष्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षक, प्रशिक्षक आणि युवक’ या थीमसह साजरे करण्यात आले.


 


हेही वाचा>>>


Travel : पांढरा शुभ्र..स्वर्गाप्रमाणे भासणारा 'चेन्नई एक्सप्रेस' मधील 'हा' तोच लोकप्रिय धबधबा! आश्चर्यकारक तथ्यं जाणून वाटेल नवल


 


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )