मुंबई : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या ‘सोनू’च्या गाण्याचीच चर्चा आहे. अनेकजण मनोरंजनासाठी गाणी तयार करत आहेत. मात्र, मुंबईतील वाडिया हॉस्पिटलने या गाण्याचा वापर जनजागृतीसाठी केला आहे. वाडिया हॉस्पिटलमधील नर्सनी ‘आई, तुला स्तनपानावर भरोसा नाय काय’ असं गाणं तयार करुन स्तनपानाविषयी जनजागृती केली आहे.

पाहा व्हिडीओ :



जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात दरवर्षी 15 दशलक्ष बाळांची प्रसूती ही मुदतपूर्व होते. मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळांना हाताळण्यासाठी सर्वच रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध असतीलच, असे नाही. परिणामी 2015 साली 1 दशलक्ष नवजात बालकांचा मृत्यू झाला. वाडिया प्रसूतीगृहामधील 150 खाटांनी सज्ज असलेल्या नवजात अतिदक्षता विभागात मुदतपूर्व प्रसूती झालेल्या सुमारे 1100  बाळांवर दरवर्षी उपचार करण्यात येतात.

बाळांची प्रकृती स्थिर होण्यासाठी वैद्यकीय उपचारांप्रमाणेच आईचे दूधही आवश्यक असते. स्तनांतून येणारे दूध प्रथिनांनी युक्त असतेच, त्याचप्रमाणे या दुधाने बाळामध्ये अधिक चांगली प्रतिकारक्षमता निर्माण होते. मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळांना दूध पाजणे आईला शक्य नसेल तर दुग्ध बँकेची मदत होते.

“वाडिया रुग्णालयातील दुग्ध बँकेत दर वर्षी 500 लिटर दूध गोळा केले जाते. मुदतपूर्व प्रसूती झालेल्या 15 ते 20 बाळांना दर दिवशी या दुधाचा लाभ होतो. प्रत्येक नवजात बालकाला आईचे दूध दिले जावे कारण त्याचे दीर्घकालीन लाभ असतात आणि बाळाच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर असते. ज्या माता आपल्या बाळाला दूध पाजू शकत नाहीत, त्यांना या दुग्ध बँकेचा फायदा होतो. ज्या दात्यांनी दूध दिले आहे आणि ज्या बाळांना हे दूध पाजले जाते त्यांच्या कुटुंबियांकडून या संदर्भात संमती घेण्यात येते.”, असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनी बोधनवाला म्हणाल्या.

वाडिया रुग्णालयातील दुग्ध बँक सेवेमध्ये प्रशिक्षित परिचारिका दूध काढतात, प्रक्रिया करतात, साठवणूक करतात आणि बाळांना ते दूध पाजतात. अतिरिक्त दूध शीतगृहात 2-4 अंश सेल्सिअस तापमानात 3 दिवस ठेवण्यात येते. या कालावधीत त्या दुधाची जीवाणूपरीक्षा होते. त्यानंतर ते 67 अंश सेल्सिअसला पाश्चराईझ करण्यात येते. त्यानंतर ते दूध उणे 8 अंश सेल्सिअस तापमानावर शीतगृहात साठवून ठेवण्यात येते. अशा प्रकारे साठवून ठेवलेले दूध 100 दिवस टिकून राहते. मातांना त्यांचे अतिरिक्त दूध दुग्ध बँकेला दान करण्याबाबत समुपदेशन करण्यात येते.